पाकिस्तानात मोठा हिंसाचार; इम्रानांच्या अटकेसाठी पोलीस का आहेत मागावर?

इस्लामाबाद: इस्लामाबाद, कराची, पेशावर आणि लाहोरसह अनेक पाकिस्तानी शहरांत पोलिसांनी मंगळवारी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या निवासस्थानाला वेढा घातल्यामुळं हिंसक संघर्ष सुरू झाला आहे.लाहोरमधील त्यांच्या जमान पार्क येथील निवासस्थानावर पोलिसांनी अश्रुधुरांचा वापर केला आहे. लोकांना शांत करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. प्रत्युत्तरादाखल इम्रान यांनी आपल्या समर्थकांना एकजुटीनं बाहेर पडण्याचं आवाहन केलंय.तोशाखाना प्रकरणात पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफच्या (PTI) प्रमुखाला अटक करण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नाला विरोध करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान, इम्रान समर्थकांशी झालेल्या संघर्षात इस्लामाबादचे डीआयजी जखमी झाले आहेत.

काय आहे तोशाखाना प्रकरण?

इम्रान खान 2018 मध्ये पंतप्रधान झाले होते. तेव्हा त्यांनी अरब देशांमध्ये प्रवास केला. त्यावेळी तिथल्या शासकांकडून इम्रान खान यांना महागड्या भेटवस्तू मिळाल्या होत्या. पाकिस्तानच्या नियमानुसार, दुसऱ्या देशांकडून मिळालेल्या जास्त किमतीच्या भेटवस्तू तोशाखानात ठेवाव्या लागतात.ऑगस्ट 2022 मध्ये इम्रान खान यांच्या अडचणी वाढल्या. पाकिस्तानच्या सत्ताधारी आघाडीनं निवडणूक आयोगाकडं एक याचिका दाखल केली. त्यात अशी मागणी केली की, पाकिस्तान तहरीक ए इन्साफ पक्षाच्या अध्यक्षांनी आपल्या संपत्तीची घोषणा केली, त्यात तोशाखानातून मिळालेल्या भेटवस्तूंबाबत माहिती दिली नाही.दरम्यान, पाकिस्तानी माध्यमांनी इम्रान खान यांनी आखाती देशातून भेट म्हणून मिळालेल्या किमती घड्याळांची विक्री केल्याचं वृत्त दिलं होतं. यातून इम्रान खान यांनी 36 मिलियन रुपये कमावल्याचा आरोपही झाला. तेव्हा इम्रान खान यांना या पूर्ण प्रक्रियेसाठी सरकारनं कायद्यानं परवानगी दिल्याचं म्हटलं होतं.



पण, ऑक्टोबर 2022 मध्ये पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाच्या पाच सदस्यीय पीठाकडून तोशाखाना प्रकरणी इम्रान खान यांना पाच वर्षे सार्वजनिक कार्यालय सांभाळण्यास बंदी घातली. तसंच इम्रान खान यांच्यावर भ्रष्टाचार विरोधी कायद्यांतर्गत कारवाई होईल, असंही सांगण्यात आलं होतं. त्यांनी ही घड्याळं आणि इतर काही भेटवस्तू तोशाखानात कधीच जमा केल्या नसल्याचा आरोप आहे. या कथित गुन्ह्यासाठी जिल्हा आणि सत्र न्यायालयानं इम्रान यांच्याविरुद्ध अटक वॉरंटही जारी केलं. इस्लामाबाद उच्च न्यायालयानं गेल्या आठवड्यात अटक वॉरंटला 13 मार्चपर्यंत स्थगिती दिली होती. पाकिस्तानमधील 21 वेगवेगळ्या एफआयआरमध्ये इम्रान यांचं नाव असल्याची माहिती आहे.

'माझी अटक लंडन योजनेचा भाग'

देशाचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावरील सर्व खटले संपवण्याच्या "लंडन योजनेचा" हा सर्व भाग असल्याचं इम्रान खान यांनी म्हटलंय. इम्रान म्हणाले, "हा लंडन योजनेचा एक भाग आहे. इम्रानला तुरुंगात टाकण्यासाठी, पीटीआयचा पाडाव करण्यासाठी आणि नवाझ शरीफ यांच्यावरील सर्व खटले पूर्ण करण्यासाठी तिथं करार करण्यात आला आहे."इम्रान यांनी आपल्या समर्थकांना सांगितलं की, "मी तुमची लढाई लढत आहे. मी आयुष्यभर लढलो आहे आणि यापुढंही लढत राहीन. पण, मला काही झालं तर त्यांनी मला तुरुंगात टाकलं किंवा मला मारलं, तरी तुम्ही ही लढाई लढू शकता."

माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरूद्ध आत्तापर्यंत दोन प्रकरणी अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलंय. यामध्ये तोशाखाना प्रकरणात कोर्टात हजर न राहिल्यानं आणि गेल्या वर्षी 20 ऑगस्ट 2022 रोजी एका जाहीर सभेला संबोधित करताना महिला न्यायाधीशाला धमकावल्याबद्दल खान यांच्याविरोधात अटक वॉरंट काढण्यात आलं आहे. त्यामुळं इम्रान यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांना आता कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते असंही समजतं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने