यशवंतरावांनी पाया रचला, पृथ्वीराज चव्हाण यांनी कळस चढवला

कराड: कऱ्हाड म्हटलं, की ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांचा कार्यकाळ आठवतो. त्यांनी आपल्या कार्यकाळात कऱ्हाडला विकासाची दिशा दाखवली. चव्हाण साहेबांनी विकासाचा पाया रचला आणि माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यावर कळस चढवला. उच्च विद्याविभूषित असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांना त्यांच्या शालेय दशेतील शिक्षणाची परिस्थिती आणि आजचा स्पर्धात्मक काळ यातील दरी माहिती होती.ती भरून काढण्यासाठी काय करायला हवे? याची त्यांना जाणीव होती. एखाद्या प्रदेशाची चौफेर भरभराट होण्यासाठी काय- काय सुविधा हव्यात याचा अभ्यासही होता. म्हणून सर्वप्रथम त्यांनी सुसज्ज विमानतळ, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, भूकंप संशोधन केंद्र यासारख्या कामांना प्राधान्य दिले. या शास्त्रोक्त कामांमुळे कऱ्हाडची ओळख आणि नोंद देशाच्या नकाशावर झाली.सातारा जिल्हा आणि कऱ्हाड तालुक्याच्या विकासाचे स्वप्न उराशी बाळगून पृथ्वीराज चव्हाण कार्यरत राहिले. त्याचा सकारात्मक परिणाम गेल्या चार वर्षांत ठळकपणे दिसून येतोय. चव्हाण कुटुंबीयांना ५० वर्षांची दीर्घ राजकीय परंपरा आहे.कऱ्हाड लोकसभा मतदारसंघात या कुटुंबाचा राजकीय दबदबा आहे. पृथ्वीराज चव्हाण यांचे वडील (कै.) दाजीसाहेब ऊर्फ आनंदराव चव्हाण, मातोश्री (कै.) प्रेमलाकाकी चव्हाण या दांपत्याने कऱ्हाड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. १९९१ मध्ये (कै.) राजीव गांधींच्या आग्रहास्तव पृथ्वीराज चव्हाण यांना राजकारणात यावे लागले.

जगात माहिती- तंत्रज्ञानाचा उगम होत असताना पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे तंत्रज्ञ राजकारणात यावेत, असा राजीव गांधींचा विचार होता. म्हणूनच पृथ्वीराजबाबा राजकारणात आले. नवखे असूनही कऱ्हाडकरांनी चव्हाण कुटुंबावरील प्रेम, श्रद्धा आणि निष्ठेमुळे पृथ्वीराजबाबांना लोकसभा निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून दिले. कऱ्हाडकरांनी त्यांना तीनदा लोकसभेत नेतृत्वाची संधी दिली.मध्यंतरी पृथ्वीराजबाबांना पक्ष नेतृत्वानेही त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री, काँग्रेसचे सरचिटणीस आणि विविध राज्यांच्या निवडणुकीत प्रभारी म्हणून जबाबदारी दिली. या सर्व जबाबदाऱ्या बाबांनी निष्ठापूर्वक आणि इमाने इतबारे पार पाडल्या. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने