अयोध्येतील भव्य राम मंदिरात मूर्तीची स्थापना अन् लोकसभा निवडणूक एकाच वर्षी, ट्रस्टचे प्रमुख म्हणाले..

अयोध्या: अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिरात रामाची मूर्ती कधी बसवली जाईल याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारी २०२४ च्या तिसर्‍या आठवड्यात भगवान रामाच्या मूर्तीची मूळ जागी प्रतिष्ठापना करतील, अशी माहिती मंदिराच्या व्यवस्थापनासाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टच्या प्रमुख सदस्याने दिली आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज म्हणाले, सध्या राम मंदिराचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. जानेवारी २०२४ च्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत, प्रभू रामाच्या मूर्तीची स्थापना केली जाईल आणि त्या दिवसापासूनच भक्तांना भेट देण्याची आणि प्रार्थना करण्याची व्यवस्था केली जाईल."मंदिर बांधकाम आणि २०२४ च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांचा संबंध नाही. आम्ही फक्त आमचे काम करत आहोत. रामललाची मूर्ती मंदिरात स्थापित करण्यापूर्वी बराच काळ कापडी पंडालमध्ये ठेवण्यात आली होती. मात्र आता देवतांना त्यांच्या मूळ जागेवर हलवण्याची वेळ आली आहे," असे देखील गोविंद देव गिरी यांनी सांगितले. गोविंद देव गिरी म्हणाले, आज जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. योग, आयुर्वेद आणि भारतीय संगीत जगभर पोहोचले असून आगामी काळात जगभरात सांस्कृतिक क्रांती होणार आहे.२०२४ मध्ये लोकसभा निवडणुका देखील लागणार आहे. त्यामुळे प्रभू रामाच्या मूर्तीची स्थापना करण्यासाठी हा वेळ निश्चित केल्याचे विरोधकांनी म्हटले आहे. मात्र गोविंद देव गिरी यांनी हा दावा फेटाळला असून आम्ही आपले काम करत असल्याचे म्हटले आहे. मात्र भाजपसाठी निवडणुकीत हा महत्वाचा मुद्दा ठरू शकतो. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने