बारामती: येत्या काही काळामध्ये बारामती सर्वांग सुंदर होईल, अनेक प्रकल्प पूर्णत्वास जातील, सत्ता नसली तरीही बारामतीच्या विकासकामांवर कोणताही परिणाम होणार नाही, अशी माहिती विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी दिली. येथील बारामती सहकारी औद्योगिक वसाहतीने उभारलेल्या पद्मश्री डॉ. अप्पासाहेब पवार उद्योग भवनाचे उद्घाटन तसेच देवा मोटर्स व केएफसी फुड सेंटरचे उद्घाटन शनिवारी (ता. 18) अजित पवार यांच्या हस्ते झाले.त्या प्रसंगी अजित पवार बोलत होते. औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष रणजित पवार, उपाध्यक्ष मनोज पोतेकर, सचिन सातव, पुरुषोत्तम जगताप, बाळासाहेब तावरे, प्रशांत काटे, संभाजी होळकर, जय पाटील, चेतन शहा वाल्हेकर, अविनाश लगड, संजय संघवी, पौर्णिमा तावरे, संग्राम सोरटे यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
बारामतीच्या सर्वांगीण विकासाचा आढावा अजित पवार यांनी आपल्या भाषणात घेतला. ते म्हणाले, लवकरच संपूर्ण बारामती शहरांमध्ये साडेतीनशेहुन अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. त्यामुळे शहराची सुरक्षितता अधिक मजबूत होईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात या प्रकल्पाला मान्यता दिली आहे.मी विरोधी पक्षात असलो तरी माझे सर्वांशी वैयक्तिक उत्तम संबंध आहे, त्यामुळे बारामतीच्या विकास कामांवर सत्ता नसल्याचा कोणताही परिणाम होणार नाही.विद्या कॉर्नर ते गदिमा यादरम्यान केलेल्या सुशोभीकरणाच्या धर्तीवरच आणखीन काही भागांमध्ये अकरा कोटी रुपये खर्च सुशोभीकरण करण्यात येणार आहे. बारामती शहरात जुनी भाजी मंडई मध्ये कोणत्याही दुकानदारावर अन्याय न करता एक सुंदर चारही बाजूने रस्ते असलेले उद्योग भवन उभारले जाणार आहे. नीरा डावा कालवा व कऱ्हा नदीच्या सुशोभिकरणाचेही काम वेगाने सुरु आहे.
जिल्हा क्रीडा संकुल, कृषी उत्पन्न बाजार समिती व दूध संघाच्या नवीन इमारतीचे आराखडे तयार असून लवकरच काम सुरु होणार आहे.तीन हत्ती चौक ते पंचायत समिती रेल्वे स्टेशनच्या बाजूच्या सेवा रस्त्याचे काम लवकर सुरू होणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. सुप्रिया सुळे यांनी रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करून त्या रस्त्यापोटी भरावयाची रक्कम कमी करून घेतली असून लवकरच नगरपालिका ती रक्कम भरून या रस्त्याचे काम सुरू केले जाईल.
तर सोडणार नाही....
सुशोभिकरण केल्यानंतर निवांतपणे बसणाऱ्या मुली किंवा महिलांची टुकार मुलांनी छेडछाड करू नये, मग तो कोणाचाही मुलगा असेल तर त्याला मी सोडणार नाही अशा सज्जड दमच अजित पवार यांनी रोड रोमिओंना दिला. पोलिसांनी देखील बारामती शहरांमध्ये प्रत्येक जण सुरक्षित असला पाहिजे याकडे लक्ष द्यावे अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
काळ वेळ कुणासाठी थांबत नाही
दरम्यान आज आपल्या मातोश्रींना 86 वर्ष पूर्ण होत आहेत व उद्या धाकटे बंधू श्रीनिवास पवार हे साठ वर्षे संपूर्ण करून 61 व्या वर्षात प्रवेश करीत असल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली. आपले धाकटे बंधू रणजित पवार यांची दाढी व केस पांढरे शुभ्र आहेत तर माझे केस काळे आहेत, पण हा फक्त रंगाचा परिणाम आहे बाकी काही नाही, अशी मिश्किल टिप्पणी करत काळ वेळ कोणासाठी थांबत नाही असे नमूद केले.