कळंबा कारागृहात पुन्हा सापडला मोबाईल

कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहात आज पुन्हा एकदा एक मोबाईल हॅण्डसेट, चार्जर आणि बॅटरी सापडली आहे. सर्कल नंबर चार विभक्त कोठडी क्रमांक १३ व १४ च्या पाठीमागील ड्रेनेजमध्ये हॅण्डसेट, चार्जर आणि बॅटरी मिळाली आहे. तुरुंगाधिकारी भारत उत्तरेश्वर पाटील यांनी आज अज्ञात कैद्याविरुद्ध जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावेळी ६५० रुपयांचे हे साहित्य जप्त करून ते पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. याची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली.मागील आठवड्यात कळंबा कारागृहाच्या शेतात गांजा, मोबाईल हॅण्डसेट, चार्जर, दोन डेटा केबल मिळाल्या होत्या. त्या कोणाच्या आहेत हा तपास अद्याप लागलेला नसताना आज पुन्हा एकदा एक मोबाईल हॅण्डसेट, चार्जर आणि बॅटरी मिळाल्यामुळे येथील सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.पोलिसांकडील माहितीनुसार, मागील आठवड्यातील कारागृहात गांजा आणि मोबाइल हॅण्डसेट मिळाल्यामुळे विशेष दक्षता पथकाच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी दोन तास सर्वच बरॅकमधील कैद्याची झडती घेतली. त्यांच्याकडील सर्व साहित्य तपासले. ही तपासणी करीत असताना सर्कल नंबर चार विभक्त कोठडी क्रमांक १३ व १४ च्या पाठीमागील ड्रेनेजमध्ये हॅण्डसेटसह चार्जर व बॅटरी मिळाली आहे.

पश्चिम विभागाचे कारागृह उप महानिरीक्षकांनी कळंबा कारागृहाची झाडाझडती घेण्याचे आदेश विशेष दक्षता पथकाला दिले होते. त्यानुसार आज ही तपासणी मोहीम झाली. त्यामध्ये आणखी धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे. कारागृहात नेमके कोण मोबाईल हॅण्डसेट वापरते. तो कारागृहात कसा आला. त्यावर कोणी संभाषण केले आहे काय याचा तपास आता पोलिसांकडून सुरू झाला आहे. कडक सुरक्षा असतानाही तेथे गांजासह मोबाईल हॅण्डसेट आत येत आहेत. सीसीटीव्ही फुटेज आहे. तरीही कारागृहाची सुरक्षा रामभरोसे झाल्याचे दिसून येत आहे. गांजा, मोबाईल हॅण्डसेटसह हाणामाऱ्या झाल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने