काँग्रेस सत्तेत आल्यास 75 टक्के पर्यंत आरक्षण वाढवणार; सिद्धरामय्यांची मोठी घोषणा

कर्नाटक: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक उरले आहेत. अशा स्थितीत राजकीय पक्षांकडून मोठ-मोठी आश्वासन दिली जात आहेत.दरम्यान, काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या  यांनीही मोठी घोषणा केलीये. काँग्रेस पक्ष  सर्व जातींसाठी त्यांच्या लोकसंख्येच्या आधारावर आरक्षणाची मर्यादा 75 टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.सध्या कर्नाटकात 66 टक्के आरक्षण आहे. यामध्ये 10 टक्के आर्थिकदृष्ट्या दुर्बलांसाठी आहे. काँग्रेस पक्ष सातत्यानं आरक्षण धोरणाला पाठिंबा देत आहे. सरकारी पदांमधील आरक्षित जागांची संख्या 75 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलंय.यापूर्वी सिद्धरामय्या म्हणाले, की प्रस्तावित 17 टक्के अंतर्गत आरक्षण विभागलं गेलं आहे. 6 टक्के एससी (विविध जाती), 4.5 टक्के मागासवर्गीयांसाठी आणि 1 टक्के इतरांसाठी आहे. मात्र, 17 टक्के वाढलेलं आरक्षण अद्याप वैध झालेलं नाही.भाजप सरकारवर निशाणा साधत सिद्धरामय्या म्हणाले, मुस्लिमांचं 4 टक्के आरक्षण संपवणं चुकीचं आहे. वोक्कलिगांनी त्यांच्या लोकसंख्येच्या आधारावर 12 टक्के आरक्षणाची मागणी केली आहे. तर, लिंगायतांनीही 2A श्रेणीत आरक्षणाची मागणी केली आहे. मात्र, याकडं दुर्लक्ष करून सरकारनं मुस्लिमांचं आरक्षण संपवलं. 

राज्यात आदर्श आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच भाजप सरकारनं मुस्लिम आरक्षण संपुष्टात आणलं, असा आरोप त्यांनी केला.सिद्धरामय्यांच्या वक्तव्यावर भाजपनं म्हटलंय, की काँग्रेस अशा गोष्टी लागू करू शकत नाही. कारण, पक्षाचं नुकसान होणार आहे. यापूर्वी राजनाथ सिंह म्हणाले होते, काँग्रेस धर्माचा वापर करून सत्तेत आली आहे. मुस्लिमांना 4 टक्के आरक्षण देण्यावरून राजनाथ सिंह यांनी हल्लाबोल केला होता. 10 मे रोजी कर्नाटकात विधानसभेची निवडणूक होणार आहे. राज्यातील सर्व 224 जागांवर एकाच वेळी मतदान होणार आहे. तर 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने