आधी शिक्षणावर, आता 'या' ठिकाणी जाण्यास महिलांवर बंदी; तालिबान सरकारचा मोठा फतवा

अफगाणिस्तान: अफगाणिस्तानात गेल्या एक वर्षापासून तालिबानची सत्ता आहे. तालिबान सत्तेत आल्यापासून अफगाणिस्तानात महिलांची  अवस्था बिकट होत चाललीये.आता तालिबान सरकारनं सोमवारी (10 एप्रिल) अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतात बाग किंवा हिरव्यागार जागा असलेल्या रेस्टॉरंटमध्ये कुटुंबं आणि महिलांच्या प्रवेशावर बंदी घातलीये. मौलवींनी केलेल्या तक्रारीनंतर तालिबान सरकारनं हा निर्णय घेतलाय.महिलांच्या उच्च शिक्षणावर बंदी घातल्यानंतर तालिबाननं महिलांविरोधात आणखी एक फतवा काढला आहे. या फतव्यानुसार, आता महिलांना हेरात प्रांतातील बागा किंवा हिरव्यागार जागा असलेल्या रेस्टॉरंटमध्ये जाता येणार नाहीये, असा फतवा त्यांनी काढलाय.तसंच या फतव्यानुसार महिलांना या ठिकाणी सहकुटुंब देखील जाता येणार नाही. एएनआयनं याबाबत ट्विटकरून माहिती दिली आहे. त्यात एएनआयनं असोसिएटेड प्रेसच्या एका अधिकाऱ्याचा हवाला देऊन म्हटलंय की, 'अशा ठिकाणी दोन्ही भिन्न लिंगांची सरमिसळ होते, त्यामुळं धार्मिक विद्वान आणि लोकांच्या तक्रारीनंतर त्यांनी हे पाऊल उचललंय.'

अधिकार्‍यांनी सांगितलं की, रेस्टॉरंटच्या बागेत असे निर्बंध लादण्यात आले आहेत. कारण, तिथं पुरुष आणि महिला एकत्र आहेत आणि महिला कथितपणे हिजाब घालत नाहीत. बाहेर खाण्यावर ही बंदी फक्त हेरातमध्ये लागू असेल जिथे पुरुषांसाठी ही सुविधा सुरू राहील. दरम्यान, हेरातच्या वर्च्यु अफेयर्स संचालनालयातील उप अधिकारी बाज मोहम्मद नझीर यांनी सर्व रेस्टॉरंट्स कुटुंबं आणि महिलांसाठी बंद असल्याचा दावा करणाऱ्या मीडिया वृत्तांचं खंडन केलंय.त्यांनी अशा वृत्तांना अपप्रचार असल्याचं म्हटलंय. हेरात हे प्रांत अफगाणिस्तानचा पश्चिमोत्तर भाग आहे. ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानात सत्ता हाती घेतल्यापासून तालिबाननं महिलांवर लादलेल्या निर्बंधांच्या मालिकेतील हे नवीनतम आहे. याआधी सहावीच्या वरच्या वर्गात मुलींना प्रवेश देणं, विद्यापीठांमध्ये महिलांची नोंदणी करणं आणि युनायटेड नेशन्ससह विविध संस्थांमध्ये महिलांना नोकरी देण्यावर बंदी घालण्यात आली होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने