चित्रा वाघांसमोरच रडले खासदार अन्‌ उमेदवार; भाजप कार्यकर्त्यांचा हायव्होल्टेज ड्रामा

कर्नाटक: कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. भाजप-काँग्रेससह जेडीएस आमने-सामने आहेत, त्यामुळं रंगत आणखी वाढली आहे.मात्र, असं असतानाच बेळगावात उमेदवारी नाकारल्यामुळं कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नागेश मन्नोळकर यांच्या निवडणूक प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत महाराष्ट्र भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांच्यासमोर भाजप कार्यकर्त्यांचा हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला.ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष धनंजय जाधव यांना उमेदवारी नाकारल्यामुळं कार्यकर्त्यांनी बैठकीत तीव्र शब्दांत रोष व्यक्त केला. या वेळी खासदार इराण्णा कडाडी आणि जाधव यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. बेळगावमधील धर्मनाथ भवन इथं भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.बेळगाव ग्रामीण मतदारसंघासाठी माजी आमदार संजय पाटील यांच्यासह ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष धनंजय जाधव इच्छुक होते. मात्र, माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी बेळगाव ग्रामीण मतदारसंघातून मन्नोळकर यांना भाजपची उमेदवारी मिळवून दिली. त्याचे पडसाद चित्रा वाघ यांच्या बैठकीत पहावयास मिळाले. या गोंधळावेळी खासदार कडाडी आणि जाधव यांना अश्रू अनावर झाले. बैठकीत दोघंही डोळे पुसत बसले होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने