छत्रपती संभाजीनगर: "कोण पालकमंत्री? मी उन्हात उभा आहे, सुर्याच्या साक्षीने आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साक्षीने सांगतो, संदीपान भुमरे फक्त आठ दिवस पालकमंत्री राहणार आहेत. तुम्हाला खोटं वाटत असेल तर लिहून घ्या" असं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे.नेते चंद्रकांत खैरे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना हा गौप्यस्फोट केला आहे. त्याचे काय कारणं असतील ते तुम्ही शोधा पण ते फक्त आठ दिवसंच पालकमंत्री म्हणून राहणार आहेत असंही ते म्हणाले.
"मातोश्रीवर गेल्यावर महाविकास आघाडी भक्कम होईल असं मला वाटत नाही. त्यांनी ठोस काम दाखावावं, आघाडी भक्कम होण्यासाठी काम करावं लागतं. शिवसेना भाजप आघाडी ही भक्कम आहे त्यामुळे महाविकास आघाडीने कितीही नाटकं केले तरी आम्हाला काही फरक पडणार नाही. बाळासाहेब होते त्यावेळचा विषय वेगळा होता पण आता हेच मातोश्री सोडून दुसरीकडे जातात. त्यामुळे सध्या मातोश्रीवर कुणीही जाऊ शकतं." असं वक्तव्य मंत्री संदीपान भुमरे यांनी केलं आहे.दरम्यान, पैठण येथील आमदार आणि मंत्री संदीपान भुमरे हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतर त्यांच्यात आणि छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यामध्ये चांगलीच जुंपली होती. दोघेही एकमेकांवर आरोप प्रात्यारोप करत असून खैरे वारंवार वेगवेगळ्या प्रकारचा दावा करत असतात.शिंदे गटातील काही आमदार माझ्या संपर्कात असून ते पुन्हा ठाकरे गटात येणार असल्याचा दावासुद्धा खैरे यांनी केला होता. त्यानंतर भुमरे हे फक्त आठ दिवस पालकमंत्री राहणार आहेत या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.