सुदानमध्ये गृहयु्द्धादरम्यान ७२ तास युद्धविराम; अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांची माहिती

खार्तुम: सुदानमधील गृहयुद्धाला कारणीभूत ठरलेल्या लष्कर व निमलष्कराचे प्रमुख ७२ तासांच्या शस्त्रसंधीसाठी सोमवारी (ता.२४) तयार झाले. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी ही माहिती दिली. सुदानमधून आपापल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न अनेक देश करीत असताना अमेरिका आणि सौदी अरेबियाने शस्त्रसंधीसाठी मध्यस्थी केली.ब्लिंकन यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली. ‘सुदानीज आर्म्ड फोर्सेस (एसएएफ) आणि ‘रॅपिड सपोर्ट फोर्स (आरएसएफ) या एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या दोन सैन्यदलांनी गुंतागुंतीच्या वाटाघाटीनंतर देशभरात ७२ तासांच्या शस्त्रसंधीसाठी होकार दिला. ही शस्त्रसंधी काल मध्यरात्रीपासून लागू झाली आहे. कायमस्वरूपी युद्धबंदीसाठी आणि मानवतावादी व्यवस्थेसाठी भागीदारांबरोबर काम करण्याच्या त्यांच्या निश्‍चयाचे आम्ही स्वागत करतो,’’ अस ब्लिंकन यांनी म्हटले आहे.



शस्त्रसंधीसाठी अमेरिका आणि सौदी अरेबियाने मध्यस्थी केली. स्थानिक वेळेनुसार सोमवारी रात्री १० पासून शस्त्रसंधी लागू झाली आहे, असे ‘सुदानी आर्म्ड फोर्सेस’ने सांगितल्याचे वृत्त ‘अल जझिरा’ने दिले आहे. सुदानी नागरिक आणि रहिवाशांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी, रुग्णालय गाठणे, सुरक्षित स्थळी आसरा घेणे आणि राजनैतिक बचाव मोहिमांसाठी मानवतेच्या दृष्टिकोनातून मार्ग उपलब्ध करण्याच्या शस्त्रसंधीला मान्यता दिली असल्याचे ‘आरएसएफ’ने एका निवेदनात म्हटले आहे. याआधी रमजान ईदनिमित्तही दोन्ही गटांनी शस्त्रसंधीला मान्यता दिली होती. पण ती निष्फळ ठरली. आता ही तीन दिवसांची शस्त्रसंधी यशस्वी ठरली तर गरजूंना अन्न आणि वैद्यकीय सेवेसारख्या अत्यंत आवश्यक गोष्टी उपलब्ध करण्याची संधी मिळू शकते, असे ‘सीएनएन’ने म्हटले आहे.

बचाव कार्याला वेग

या युद्धविरामामुळे सुदानमधील परदेशी लोकांना यशस्वीपणे बाहेर काढण्यास मदत होणार आहे. स्पेन, जॉर्डन, इटली, फ्रान्स, डेन्मार्क आणि जर्मनीसारख्या देशांनी त्यांच्या नागरिकांची सुटका यशस्वीपणे केली आहे. ब्रिटनने त्यांच्या दूतावासातील कर्मचाऱ्यांना बाहेर काढले असून त्यांच्या अनेत ताफ्यांमध्ये अन्य देशांच्या नागरिकांचीही सुटका करण्यात आली आहे. सुदानमध्ये अडकलेल्या ब्रिटिश नागरिकांची थेट संपर्क साधण्यास ब्रिटनने मंगळवारी सुरुवात केली आहे. शस्त्रसंधीनंतर त्यांना सुदानबाहेर काढण्यास मार्गही उपलब्ध करून दिले जात आहे. ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री जेम्स क्लेव्हर्ली यांनी ही माहिती ट्विटवर दिली आहे. ब्रिटिश पासपोर्ट धारकांना सुदानमधून प्राधान्याने बाहेर काढण्यास जाण्यास ब्रिटिश सरकारचे प्राधान्य असेल. जोपर्यंत बोलावणे येत नाही, तोपर्यंत सुदानमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न स्वतः करू नये, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.

‘सुदानला संकटातून बाहेर काढावे’

संयुक्त राष्‍ट्रांचे (यूएन) सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस म्हणाले, की सुदानमधील हिंसाचार हा भयानक आगीचा डोंब असून त्यात हा संपूर्ण प्रदेश व इतर भागही खाक होण्याचा धोका आहे. सुदानला पुन्हा लोकशाही मार्गावर आणण्यासाठी यूएनच्या सुरक्षा समितीने त्यांच्या अधिकाराचा वापर करावा. या कठीण काळात आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत. ‘यूएन’ काही कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना तात्पुरते स्थलांतर करण्यास परवानगी देत असल्याचेही त्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने