नवी दिल्ली: विधानसभेच्या विशेष सत्रात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘चौथी पास राजा’ या कथेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडविली. मोदी यांचे नाव न घेता त्यांनी टीका केली. या व्यक्तीचा जीवनपट नकारात्मक असल्याचे आणि ही व्यक्ती देशासाठी घातक असल्याचे आरोप त्यांनी केले.मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणी चौकशीसाठी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) शुक्रवारी समन्स पाठविल्यानंतर केजरीवाल यांनी हे सत्र बोलाविण्याची घोषणा केली होती. या सत्रात दिल्ली सरकारचे मंत्री आणि आम आदमी पक्षाच्या (आप) नेत्यांवर सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयातर्फे (ईडी) होणाऱ्या कारवाई संदर्भात चर्चा केली जाणार होती. रविवारी सीबीआयने केजरीवाल यांची तब्बल नऊ तास चौकशी केली. या चौकशीत सीबीआय अधिकाऱ्यांकडून चांगली वागणूक मिळाल्याने केजरीवाल यांनी सोमवारी झालेल्या सत्रात ‘सीबीआय''चा उल्लेख न करता ‘चौथी पास राजा’ ही गोष्ट सांगितली. मात्र ज्या उद्देशाने सत्र बोलावले त्यास बगल देत केजरीवाल यांनी कथेला प्राधान्य दिले.
या कथेतील व्यक्तीरेखेचा केजरीवाल यांनी ‘अशिक्षित, चौथी पास, अहंकारी, भ्रष्टाचारी आणि राणी नसलेला राजा‘ असा उल्लेख केला. ते पुढे म्हणाले की, ‘एका गरीब घरात जन्मास आलेला हा राजा रेल्वे स्थानकावर चहा विकत होता. पुढे सम्राट झाल्यावर जवळच्या मित्राच्या सहकार्याने त्याने बँकांतील खजिना रिकामा केला. त्याने रेल्वे विकल्या, विमानतळे विकली, तीन काळे कृषी कायदे आणले, पेट्रोल-डिझेलचे भाव वाढवले. शिक्षणाबाबत कोणी माहितीच्या अधिकारात विचारणा केली तर संबंधित व्यक्तीला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येत होता. एके दिवशी हा राजा भ्रष्ट असल्यावर लोकांना विश्वास बसला आणि त्यांनी त्याला पदावरून खाली ओढले गेले.’
भाजपची निदर्शने
केजरीवाल यांना मद्य धोरण गैरव्यवहारप्रकरणी सीबीआयने चौकशीला बोलावल्यामुळे भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी विधानसभेसमोर निदर्शने केली. केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
माकन यांच्या मताची चर्चा
दुसरीकडे काँग्रेसचे नेते अजय माकन हा गैरव्यवहार खूप मोठा असल्याने यांनी काँग्रेसने केजरीवाल यांच्या पाठीशी उभे राहू नये, अशी प्रतिक्रिया दिली आहे. यावर माकन यांचे ते खासगी मत असल्याचे काँग्रेसतर्फे स्पष्ट करण्यात आले. ‘आप’चे खासदार संजय सिंह यांनी माकन काँग्रेसमध्ये असले तरी ते भाजपच्या जवळ असल्याची टीका केली.