कर्नाटक: कर्नाटकातील भाजपच्या सरकारने जनतेची निर्लज्जपणे लूट केली आहे. प्रत्येक कामासाठी ४० टक्के कमिशन घेणारे भाजपचे सरकार आहे. या भ्रष्टाचारावरून पंतप्रधानांना अनेकांनी पत्र लिहिली, परंतु त्यावर पंतप्रधानांनी मौन बाळगले आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज केली.विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टी.नरसीपुरा येथे उमेदवारांच्या प्रचारार्थ पहिली सभा झाली. यावेळी त्यांनी कर्नाटकातील विद्यमान सरकार ४० टक्के कमिशन घेणारे असल्याची टीका केली. या सरकारच्या काळात अनेक गैरव्यवहार झाले. भ्रष्टाचारामुळे एका कंत्राटदाराने आत्महत्या केली. पोलिस भरतीतही गैरप्रकार झाला. प्रत्येक विभागात भ्रष्टाचार झाला. या भ्रष्टाचाराबाबत कंत्राटदार संघटनांनी, शाळा व्यवस्थापन संघटनांनी पंतप्रधानांना पत्र लिहले. परंतु काहीच तोडगा निघाला नाही. कारण त्यांचा भाजपशी संबंध होता. एका आमदाराच्या मुलाच्या घरातून ८ कोटींची रोकड मिळाली आहे. परंतु त्याच्यावर कारवाई झाली नाही. जनतेला, राज्याला लुटण्याची कोणतीच संधी भाजपवाले सोडत नाहीत. कर्नाटकातून सुमारे दीड लाख कोटींची लूट झाली असल्याचे बोलले जात आहे, असा आरोप प्रियांका यांनी केला.
स्थानिक दूध ब्रँड नंदिनीवरूनही प्रियांका गांधी यांनी कर्नाटक सरकारवर चौफेर हल्ला केला. त्या म्हणाल्या, भाजपने नंदिनी ब्रँड बंद पाडण्याचा डाव रचला. काँग्रेसच्या काळात नंदिनी ब्रँडचे उत्पादन एवढे होते की शाळेतील मुलांना दूध दिले जायचे. एवढेच नाही तर दुधाचे विक्रमी उत्पादन होत असल्याने शेतकऱ्यांना लिटरमागे पाच रुपये देत होतो. देश आणि राज्य हे आपल्या संस्कृती, परंपरेतून उभा राहते. शेतात काम करणारे बंधू असतील किंवा भगिनी असतील किंवा घरात किंवा घराबाहेर काम करणारे असतील त्यांच्या कष्टातून देशाची, राज्याची बांधणी झाली आहे. आपल्या राज्याचा, देशाचा अभिमान बाळगतो. कारण आपले त्यात योगदान असते.शेतात जेव्हा चांगले पीक येते तेव्हा आपल्या चेहऱ्यावर आनंद दिसतो. कारण त्यात कष्ट असतात, मेहनत असते. याप्रमाणे सरकार असायला हवे. देश आणि राज्यांची उभारणी करण्यास मदत करणारे सरकार राज्यात, देशात हवे. आपण ज्यांच्यावर विश्वासू ठेऊ असे राज्यकर्ते असावेत, असे गांधी म्हणाल्या. जनतेचा आवाज ऐकणारे आणि समजून घेणारे सरकार असावे. आपल्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणारे सरकार सत्तेत असावे आणि असे सरकार केवळ काँग्रेस देऊ शकते, असा विश्वास प्रियांका गांधी यांनी व्यक्त केला.
पंतप्रधानांना दीर्घायुष्य लाभावे: प्रियांका
सभेत बोलताना प्रियांका गांधी म्हणाल्या, की भाजपचे नेते कर्नाटकात येतात आणि काहीतरी बोलून जातात. मी असे ऐकले की पंतप्रधान म्हणत होते की, विरोधी पक्षाच्या नेत्यांना माझे थडगे बांधायचे आहे. हे काय बोलणं झालं. या देशात असा कोणीही विचार करत नसेल. आपल्या पंतप्रधानांचे आरोग्य चांगले राहावे आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावे, अशी माझी इच्छा आहे. मला तुम्हाला (लोकांना) विचारायचे आहे,की हा निवडणुकीचा मुद्दा आहे का? ते विचित्र काहीतरी मुद्दे मांडतात. आपल्याबद्दल, जनतेबद्दल का बोलत नाहीत. महागाई, बेरोजगारी आणि तुम्हाला विकासाच्या दिशेने नेण्याबाबत का बोलत नाहीत, असा सवालही प्रियांका गांधी यावेळी केला.