चीन, उत्तर कोरिया, रशियाविरुद्ध मोर्चेबांधणी; जी-७ समूह युद्धखोरांबाबत ठाम

जपान: जगातील श्रीमंत लोकशाही देशांचा समावेश असलेल्या जी-७ समुहाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांनी चीन, उत्तर कोरिया आणि रशिया या युद्धखोर देशांबाबत कडक भूमिका घेण्याचा निर्धार केला आहे. त्यादृष्टिने जपानमधील परिषदेत विचारमंथन केले जाईल. पुढील महिन्यात जपानमधील हिरोशिमा येथे जी-७ समूहातील प्रमुखांची शिखर परिषद होणार आहे. त्यादृष्टिने पूर्वतयारीवर भर देण्यात येईल.जपानचे परराष्ट्र मंत्री योशीहामा हायाशी यांनी समूहातील सहकारी परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद साधला. त्यात युक्रेनविरुद्ध युद्ध छेडलेल्या रशियाचे बळाचा वापर करण्याचे एकतर्फी धोरण नाकारण्यात आले. रशियाने अण्वस्त्रांचा वापर करण्याचेही इशारे वारंवार दिले आहेत.अमेरिकेच्या शिष्टमंडळासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाच्या क्षणी होत आहे. रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर कसा सामना करायचा यासाठी जी-७, युरोपीय महासंघ अशा समुहांतील देश मोर्चेबांधणी करीत आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय नियमांवर आधारित व्यवस्थेसमोर सर्वांत मोठा धोका रशियामुळे निर्माण झाला आहे.अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांच्या शिष्टमंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, युक्रेनच्या बाजूने पाठिंबा एकवटणे हे बायडेन प्रशासनाचे या बैठकीसाठीचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यासाठी युक्रेनच्या ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत सुविधा भक्कम करण्यासाठी पावले उचलली जातील. याशिवाय युक्रेनला देण्यात येत असलेले लष्करी सहकार्य कायम ठेवले जाईल. याशिवाय रशियावर आणखी निर्बंध लादण्यासाठीही रणनीती आखण्यात येईल.

चीन - तैवानला घेरण्याचा लष्करी सराव

चीनने तैवानबाबत सतत आक्रमक रणनितीचा अवलंब केला आहे. नुकतीच लढाऊ विमाने आणि युद्धनौका धाडून तैवानला घेरण्याचेा लष्करी सराव चीनने केला. याशिवाय दक्षिण चिनी समुद्रावरील वर्चस्वाचा दावा चीनने वेळोवेळी अधोरेखित केला आहे. त्यासाठी चीनने अण्विक अस्त्रांच्या संख्येत सतत भर घातली आहे. त्यामुळे या क्षेत्रात संघर्षाची टांगती तलवार सतत राहिली आहे. चीनची आक्रमकता तैवानशिवाय जपानसाठीही चिंतेची बाब ठरली आहे.दुसऱ्या महायुद्धानंतर जपानने केवळ स्वसंरक्षणाबाबत तात्त्विक भूमिका घेतली. त्यानुसार कोणताही आंतरराष्ट्रीय तंटा सोडविण्यासाठी हिंसेचा अवलंब करायचा नाही असे जपानचे धोरण आहे, मात्र चीनच्या वाढत्या धोक्यामुळे जपानने शत्रू हल्ला करण्यापूर्वीच त्याला तडाखा देण्याची क्षमता तसेच अचूक हल्ला करणाऱ्या क्षेपणास्त्रांची सज्जता विकसित करण्यावर भर दिला आहे. दरम्यान, चीनने अमेरिकेत हेरगिरी करणारे बलून सोडल्यामुळे तणावात भर पडली आहे.

उत्तर कोरिया ः क्षेपणास्त्र चाचण्यांचा सपाटा

उत्तर कोरियाने लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या अनिर्बंध चाचण्या घेणे सुरुच ठेवले आहे. शेजारी देशांसाठी ही चिंतेची बाब ठरली आहे. गेल्या वर्षापासून उत्तर कोरियाने सुमारे शंभर आंतरखंडीय क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेतल्या आहेत. त्यावरून थेट अमेरिकेपर्यंत डागता येतील इतक्या क्षमतेची क्षेपणास्त्रे उत्तर कोरियाने विकसित केल्याचे स्पष्ट होते.याशिवाय लघु टप्प्याच्या इतर शस्त्रास्त्रांच्याही चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे दक्षिण कोरिया तसेच जपान अशा शेजारी देशांना धोका निर्माण झाला आहे. जी-७ समुहाच्या या परिषदेच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचणी घेत आपले आक्रमक इरादे स्पष्ट केले. या समुहाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी उत्तर कोरियाचा तीव्र निषेध केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने