मुंबई: उद्योजक गौतम अदानी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. सिल्वर ओकवर दोघांच्यात तब्बत २ तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, दोघांच्यातील चर्चा अद्यार गुलदस्त्यात आहे. दरम्यान राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
मुलाखतीदरम्यान शरद पवारांनी अदानींची केली होती पाठराखण:
हिंडेनबर्ग अहवालानंतर विरोधकांनी अदानी समूहाबाबत आक्रमक पवित्रा घेतला असताना शरद पवारांनी वेगळी भूमिका मांडली.शरद पवार यांनी ‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत संसद अधिवेशन, अदानी आदी अनेक मुद्यांवर भाष्य केले. पूर्वी सरकारवर टीकेची झोड उठविण्यासाठी टाटा-बिर्ला समूहांची नावे विरोधकांकडून घेतली जात होती. या समूहांचे देशाच्या विकासातील योगदान सर्वांना माहीत आहे.आताच्या काळात अदानी-अंबानी समूहांची नावे सरकारला लक्ष्य करताना घेतली जातात. अंबानी समूहाने पेट्रोकेमिकल्स आणि अन्य क्षेत्रांत भरीव काम केले आहे. अदानी समूहाने वीज व अन्य क्षेत्रांत मोठे काम केले आहे.
देशाला त्याची गरज आहे. या समूहांनी बेकायदा किंवा काही चुकीचे केले असल्याचे पुरावे असतील तर टीका करण्याचा हक्क लोकशाहीत आहेच, पण पुरावे नसल्यास ते चुकीचे आहे’’, असे पवार म्हणाले.काँग्रेसनं भाजपला घेरण्यासाठी अदानींविरोधातील हिंडेनबर्गचा मुद्दा लावून धरला आहे. अधिवेशनादरम्यान लोकसभा बंद पाडण्यापर्यंत हा मुद्दा तापला होता.पण शरद पवार यांनी याप्रकणावर भाष्य करताना काँग्रेसनं लावून धरलेली जेपीसीची अर्थात जॉईन्ट पार्लमेंटरी कमिटीच्या चौकशीऐवजी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधिशांमार्फत चौकशीची मागणी केली. त्यामुळं पवारांवर अनेकांनी टीकाही केली आहे.अदाणी प्रकरणाची चौकशी व्हावी, असं मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं होत. या प्रकरणात जेपीसी चौकशी का महत्त्वाची आहे यावर त्यांनी भाष्य केलं आहे.सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे कष्टाचे हजारो कोटी रुपये कुठे गेले, याचा शोध घेण्यासाठी अदानी उद्योग समूहाची नि:पक्षपातीपणे चौकशी झालीच पाहिजे, असेही ते म्हणाले.