खोकला-तापाचे रुग्ण 3 दिवसात बरे होताहेत! जाणुन घ्या काय असावा आहार

मुंबई: उन्हाचा तडाखा, प्रचंड उकाडा आणि पावसाचा शिडकावा अशा दिवसभरात बदल जाणाऱ्या हवामानामध्ये तुम्हाला तंदुरुस्त राह्यचयं? आहारात तुमच्या भात, खोबरे, उसळ, फळभाज्यांचा समावेश करावा, असा सल्ला आयुर्वेद तज्ज्ञांनी दिला आहे.तसेच आयुर्वेद तज्ज्ञ आणि ॲलोपॅथी डॉक्टरांकडून तपासल्या जाणाऱ्या रुग्णांमध्ये खोकला, तापाचे रुग्णांची संख्या आहे. मात्र ताप तीन दिवस राहिला, तरीही उपचाराने रुग्ण ठणठणीत बरे होत असल्याचे आढळत आहे.

घसा थंड व्हावा म्हणून अति थंड पाण्यासोबत शीतपेयांचा वापर केला जातो. उकाड्यामुळे पंख्याखाली, वातानुकूलित खोलीत बसणे यामुळे आजाराला आमंत्रण मिळत आहे.त्यामुळे शक्यतो पंख्याखाली अथवा वातानुकूलित भागात अधिक काळ बसणे, झोपणे टाळायला हवे, असे सांगून आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य विक्रांत जाधव म्हणाले, की लिंबू सरबत, आवळ्याचा सरबत, कोकम सरबत प्यायला सुरवात करावी.घराच्याबाहेर खाणे टाळावे. अतिथंड आणि घराच्या बाहेरील पाणी पिणे टाळावे. शिवाय दररोजच्या आहारात गरम -ताजे खाद्यपदार्थ खावेत. उसळींचा वापर अधिक करावा. भोजनानंतर कोमट पाणी प्यावे. जड आणि तळलेले पदार्थ टाळायला हवेत.किमान-कमाल तापमानात मोठा फरक

दिवसभरात हवामान बदलत असले, तरीही किमान आणि कमाल तापमानात मोठा फरक आहे. आज तापमान किमान वीस, तर कमाल ३८.५ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. अशा परिस्थितीत काय करायला हवे, या प्रश्‍नाला उत्तर देताना वैद्य जाधव म्हणाले, की वृद्धांनी घराबाहेर पडताना गारठा बाधणार नाही याची काळजी घ्यावी.उन्हाचा तडाखा वाढत असल्याने व्यायाम अर्ध्यावर आणावा. आजारी पडलेल्या मुलांना उपचारासाठी कुटुंबीय घेऊन येतात, तेव्हा मुलं शाळेत जाऊन आजारी पडतात, असे सांगतात. प्रत्यक्षात मुलांनी अधिकाअधिक खेळायला हवे.शाळेत जाण्याने मुले आजारी पडतात असे मानण्याचेही कारण नाही. गारव्याच्या झोतामुळे मान आणि कंबरेच्या मणक्यांचा त्रास वाढला आहे. त्यावर उपचार घेत असताना गारव्याच्या झोतात अधिक काळ राहायचे नाही, याची खबरदारी घेणे आवश्‍यक आहे.

पावसात भिजणे टाळावे

उन्हाप्रमाणे अवकाळी पावसात भिजणे टाळायला हवे, असे सांगून डॉ. सुनील औंधकर म्हणाले, की थंड खाणे, थंड पिणे यामुळे घशावर परिणाम होतो. त्याचबरोबर पचनसंस्थेवर परिणाम होतो आणि उलट्या-जुलाब सुरु होतात.अंगात पाणी कमी झाल्याने थकवा जाणवतो, काहींना चक्कर येते. एवढेच नव्हे, तर कांजण्या, गालफुगीचे रुग्ण आढळतात. ताप आणि वेदनाशामक औषधांनी पाच ते सहा दिवसांमध्ये रुग्णांना बरे वाटते.मात्र तोपर्यंत संसर्गाचा इतरांना त्रास होऊ शकतो. पूर्वी कांजण्या झालेल्यांपैकी दहा ते पंधरा टक्के जणांना नागीण झाल्याचे आढळून येत आहे. त्वचेशी निगडित त्रास होणारे रुग्ण इलाजासाठी येताहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने