मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची ११ वर्षीय मुलगी आराध्या बच्चन सध्या भलतीच चर्चेत आली आहे. कारण तिच्या विरोधात खोटी माहिती पसरवणाऱ्या युट्युब टॅब्लॉइड विरोधात बच्चन कुटुंबानं दिल्ली कोर्टात धाव घेतली होती.आता त्या याचिकेवर कोर्टानं निर्णय दिला आहे. दिल्ली हाय कोर्टानं युट्युबला आक्षेपार्ह माहिती लागलीच काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. एवढंच नाही तर कोर्टानं युट्युब वरील अनेक चॅनल्सना समन्स देखील पाठवले आहे.आराध्यानं तिचे वडील अभिषेक बच्चन यांच्या माध्यमातून ही याचिका दाखल केली होती. आराध्याचं म्हणणं होतं की या वादग्रस्त व्हिडीओच्या माध्यमातून ती गंभीररित्या आजारी असल्याचं दाखवलं गेलं होतं.
एवढंच नाही तर कितीतरी जणांनी ती या जगातच नाही असा दावा केला होता. हाय कोर्टानं अशा आक्षेपार्ह कंटेटला लागलीच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरनं काढून टाकण्याचे आणि त्या चॅनेल्सना ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत.आराध्या बच्चनच्या प्रकृतीविषयी काही युट्युब चॅनल्सनी अफवा पसरवल्या होत्या. याला पाहिल्यानंतर बच्चन कुटुंबाचा पारा चढला आणि त्यांनी या चॅनल्स विरोधात तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता. बच्चन कुटुंबानं दिल्ली हाय कोर्टात याचिकाही दाखल केली होती.माहितीसाठी इथे सांगतो की,आराध्या बच्चनला अनेकदा ट्रोल केलं गेलं आहे आणि यावर अभिषेक बच्चन अनेकदा रिअॅक्ट झाला आहे. त्यानं एकदा म्हटलं होतं की त्याच्या मुलीच्या विरोधात काहीही चुकीचं बोललं गेलं तर तो सहन करणार नाही. त्याचं म्हणणं होतं की तो पब्लिक फिगर आहे पण त्याची मुलगी नाही. आणि त्यामुळे आराध्या विषयी कोणी काहीही बोललं तर तो गप्प बसणार नाही.