जयसिंगपूरचं भडंग चक्क अमेरिकेतही फेमस; तुम्ही कधी खाल्लंय का?

कोल्हापूर: महाराष्ट्राची खाद्य संस्कृती ही महाराष्ट्राबाहेरही तितकीच नावाजलेली आहे. या खाद्य संस्कृतीने अनेक शहरांना गावांना ओळख दिली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील काही शहर किंवा गावातील खाद्यसंस्कृतीने एक वेगळी ओळख तयार केली आहे. त्यामुळे जेव्हा केव्हाही त्या खाद्यपदार्थाचा उल्लेख केला जातो तेव्हा त्यापुढे त्या गावाचा किंवा शहराचाही उल्लेख होतो. याच उत्तम उदाहरण म्हणजे जयसिंगपूरचं भडंग.आज आपण जयसिंगपूरचं भडंग कसं जन्माला आलं? त्याचा इतिहास आणि सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.कोल्हापूर-सांगली हायवेला जयसिंगपूर हे गाव वसलेलं आहे. या जयसिंगपूरच भडंग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि महाराष्ट्रबाहेरही खूप प्रसिद्ध आहे. तुम्हाला वाटेल एका छोट्याश्या गावातील हे भडंग प्रसिद्ध कसं झालं? तर याचा खास इतिहास आहे.जयसिंगपूर हे छत्रपती शाहू महाराजांनी स्थापन केलेले गाव. कालांतराने येथे उद्योग वाढला. त्यामुळे अनेक लोक रोजगारासाठी जयसिंगपूरमध्ये स्थलांतरीत झाले. त्याच दरम्यान अगदी ६०च्या दशकात जगू मुल्ल्या नावाचे गृहस्थ व्यवसाय करण्याच्या उद्देशाने उडपीवरुन जयसिंगपूरमध्ये आले आणि त्यांनी एक छोटसं नाश्त्याचं हॉटेल उभारलं, ते वर्ष होतं १९६३चं.त्यावेळी त्यांच्या नाश्त्यामध्ये एक मेन्यू होता तो म्हणजे भडंगचा. सुरवातीला ते भडंग हे पेपरमध्ये बांधून द्यायचे. असं म्हणतात की ते साधारण भडंगलाही गरमागरम फोडणी देऊन त्यावर कांदा, लिंबू, कोथिंबिर टाकून सर्व्ह करायचे.

 खाणाऱ्या प्रत्येकाला ही भडंग अधिक चविष्ट वाटायची. जसे दिवस जात होते तशी त्यांची भडंग तितकीच फेमस होत होती.सांगली कोल्हापूर हायवेवर हे गाव असल्याने तेथून ये जा करणाऱ्या लोकांच्या तोंडी भडंगची टेस्ट येत होती. मग सांगली असो की कोल्हापूर, कर्नाटक असो की कोकण या भागातील लोकांनी भडंगला आणखी फेमस केले.पुढे त्यांची दुसरी पिढी आली त्यांनी जगू मुल्ल्या यांची टेस्ट मेंटेन ठेवली. त्यानंतर तिसऱ्या पिढीनेही या टेस्टला मेंटेन ठेवले त्यामुळेच जयसिंगपूरच्या भडंगची चर्चा दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढतेय.भडंगची विक्री दिवसेंदिवस वाढत होती त्यामुळे प्रत्येकवेळी भडंग कागदात गुंडाळून विक्री करणे शक्य नव्हते. त्यामुळे २००० या वर्षी मुल्ल्या कुटूंबानी पॅकेजिंगद्वारे भडंग सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पुन्हा याची विक्री वाढली. महाराष्ट्रबाहेर आणि देशाबाहेर अमेरिकेतही या भडंगची विक्री होऊ लागली. मुल्ल्या कुटूबांची अंबा भडंग आणि जय अंबा भडंग असे दोन ब्रांड आहे जे देश आणि देशाबाहेरील विक्री करतात आणि त्यामुळेच महाराष्ट्रातील एक छोटसं गाव जयसिंगपूरची चर्चा देश आणि विदेशात होतेय.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने