देशातील मोठ्या सात शहरांत गृहविक्री वेगाने

नवी दिल्ली:  देशातील प्रमुख सात शहरांमध्ये घरांची मागणी वेगाने वाढत असल्याने गृहविक्रीसाठीचा कालावधीही मार्च तिमाही अखेर पाच वर्षांतील नीचांकी पातळीवर आला आहे. त्यामुळे विक्रीविना पडून असलेल्या घरांचे प्रमाणही घटले आहे, असे गृहनिर्माण क्षेत्रातील सल्लागार कंपनी ‘अॅनारॉक’च्या अहवालात म्हटले आहे. डिसेंबर २०२० मध्ये संपलेल्या तिमाहीत हा कालावधी ५५ महिने इतका उच्चांकी स्तरावर होता.एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये जास्त मागणी असल्याने घरांची विक्री वेगाने होत आहे. त्यामुळे शिल्लक घरांची संख्या कमी होत आहे, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. बंगळूरमध्ये विक्री होण्याचा कालावधी १३ महिने इतका सर्वांत कमी आहे. कॅलेंडर वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च) या सात शहरांमध्ये एक लाख १४ हजारांहून अधिक घरांची विक्रमी विक्री नोंदवली असून, या तिमाहीने गृहविक्रीतील सर्व विक्रम मोडले आहेत. प्रथमच तिमाहीत एक लाख घरांचा टप्पा पार केला आहे, असे अॅनारॉक समूहाचे अध्यक्ष अनुज पुरी यांनी सांगितले.

मुंबई आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर) सर्वांधिक विक्री झालेली शहरे ठरली असून, एनसीआरमध्ये कमाल पाच वर्षांतील ४३ महिन्यांचा नीचांक नोंदवला गेला. मुंबईमध्ये तिमाहीत ३४,६९० घरांची विक्री झाली. मुंबई, हैदराबादमध्ये इन्व्हेंटरी ओव्हरहॅंग २१ महिन्यांपर्यंत तर पुणे, चेन्नई व कोलकतामध्ये तो २० महिन्यांपर्यंत कमी झाला असल्याचे या अहवालात म्हटले आहे.मालकीचे घर घेण्याची वाढती मानसिकता, तुलनेने कमी गृहकर्ज दर, अलिशान घरांच्या निर्मितीत वाढ आणि पुढील किमती वाढण्याची अपेक्षा हे घरांच्या विक्रीला चालना देणारे प्रमुख घटक आहेत. यामुळे प्रमुख गृहनिर्माण बाजारपेठा असलेल्या शहरांमध्ये घरांची विक्री वाढली असून, शिल्लक घरांची संख्या कमी होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने