अजितदादा, राज ठाकरेंबाबत आठवलेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, मुख्यमंत्रिपदाची संधी लवकरच..

सातारा : मुख्यमंत्री व्हावे, अशी प्रत्येक नेत्याची इच्छा असते. अजित पवारांचीही आहे; पण ती सगळ्यांचीच पूर्ण होत नाही. पवार भाजपमध्ये आले तरीही त्यांना मुख्यमंत्रिपदाची संधी लवकर मिळेल असं नाही. मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदेच राहतील, असा दावा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले  यांनी केला.दरम्यान, राज ठाकरेंना  सोबत घेणे भाजपला देशपातळीवर परवडणारे नाही. माझा पक्ष आहे, तोपर्यंत राज ठाकरेंची आवश्यकता नाही, असा टोलाही श्री. आठवले यांनी लगावला. सांगलीकडं जाताना मंत्री आठवले साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहात अल्पवेळ थांबले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

'..त्यामुळंच शिवसेनेत महाबंड झालं'

रामदास आठवले म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री शिंदे हे साताऱ्यात त्यांच्या कुटुंबीयांशी, शेतकऱ्यांशी भेटण्यासाठी आले होते. त्यांच्यावर टांगती तलवार नसून, ती उद्धव ठाकरे यांच्यावर आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर ते काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेले नसते. संजय राऊतांच्या भूलथापांना बळी पडून ठाकरे राष्ट्रवादी, काँग्रेससोबत गेले. उद्धव ठाकरे यांनी आमदारांची कामे केली नाहीत. त्यामुळेच शिवसेनेत महाबंड झाले. महायुती भक्कम आहे.’’

'अजित पवारांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती; पण..'

मुख्यमंत्रिपदाबाबत नेत्यांच्या बॅनरबाजीबाबत आठवले यांना विचारले असता ते म्हणाले, की बॅनर लावणारे कार्यकर्ते उत्साही असतात. मुख्यमंत्री होण्याची इच्छा अनेकांची असते; पण ती पूर्ण होत नाही. यापूर्वी राष्ट्रवादी, काँग्रेसचे सरकार आले होते, तेव्हा अजित पवारांची  मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती; पण तेव्हा संधी मिळाली नाही. आता लवकर संधी मिळेल असे नाही. ते ज्येष्ठ नेते आहेत, जनतेशी संवाद साधणारे आहेत, पवार साहेबांच्या तालमीत तयार झालेले आहेत. त्यामुळे ते भाजपसोबत आले तर त्यांचे स्वागत आहे; पण त्यांना लगेच मुख्यमंत्रिपद मिळेल असे नाही. मात्र, तरीही शिंदेच मुख्यमंत्री राहतील, असेही मंत्री आठवले म्हणाले.



'राज ठाकरेंना सोबत घेणं भाजपला परवडणारं नाही'

राज ठाकरे यांनी स्वतंत्र राहावे. त्यांना भाषण करायला आवडते. ते आमच्यासोबत आले तर त्यांना एवढे भाषण करायला मिळणार नाही. त्यांची आम्हाला आवश्यकता नाही. त्यांना सोबत घेणे भाजपला देशपातळीवर परवडणारे नाही. माझा पक्ष आहे, तोपर्यंत राज ठाकरेंची आवश्यकता नाही, असा टोलाही श्री. आठवले यांनी लगावला.

रिपाईचे शिर्डीत अधिवेशन

रिपब्लिकन पक्षाचे देशव्यापी अधिवेशन 28 मे रोजी शिर्डीत होणार आहे, असे सांगून मंत्री आठवले म्हणाले, ‘‘त्यापूर्वी 27 मे रोजी ऑल इंडिया कमिटीतील प्रमुखांची बैठक होईल. त्यामध्ये संपूर्ण देशभरात रिपब्लिकन पक्ष वाढविण्याबाबत चर्चा होणार आहे, तसेच या अधिवेशनात केंद्र व राज्य सरकारकडे विविध मागण्या केल्या जाणार आहेत. यामध्ये भूमिहिन कुटुंबाला पाच एकर जमीन द्यावी, अशी मागणी केली जाणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने