उत्तर प्रदेश: माफिया अतिक आणि त्याचा भाऊ अशरफला तीन हल्लेखोरांनी भररस्त्यात गोळ्या घालून ठार केलं आहे. मात्र, आता कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अतिक अहमदची एन्ट्री झालीये. कशी ती जाणून घ्या..काँग्रेसचे राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढ़ी हे अतिक अहमदला आपला गुरू मानत असल्याचा आरोप भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी केलाय. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, ते (इमरान प्रतापगढ़ी) माफिया अतिक आणि अशरफ अहमदला आपला गुरू मानत होते, असं त्यांनी म्हटलंय.मोदी सरकारमधील मंत्री करंदलाजे पुढं म्हणाल्या, कर्नाटकात प्रतापगढ़ी यांनी हिंदुविरोधी भाषण केलं होतं. ते म्हणाले होते, मुस्लिम हे डोकं टेकवणारे लोक नाहीत तर ते मुंडकं छाटणारे आहेत, अशी त्यांनी आठवण करुन दिली. कर्नाटक निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांच्या यादीत काँग्रेसनं इम्रान प्रतापगढी यांचा समावेश केला आहे.
अतिकच्या हत्येवरून राजकारण
यापूर्वी समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी अतिक अहमदच्या हत्येवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्याशिवाय बसपा सुप्रीमो मायावती यांनीही प्रश्न उपस्थित केलाय. तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीही या हत्याकांडावरून यूपीच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.