बळजबरीनं गप्प बसून देशाचे प्रश्न सुटणार नाहीत; सोनिया गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

दिल्ली: राहुल गांधी यांचं सदस्यत्व रद्द करण्यावरून आणि अदानी प्रकरणावरून काँग्रेस केंद्र सरकारवर सातत्यानं हल्लाबोल करत आहे. आता काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी  यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधलाय.'द हिंदू' वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी  आणि केंद्र सरकारवर हल्ला चढवलाय. जबरदस्तीनं मौन बाळगून देशाचे प्रश्न सुटणार नाहीत, असं त्यांनी म्हटलंय.'जबरदस्तीचे मौन भारताच्या समस्या सोडवू शकत नाहीत' या लेखात सोनियांनी म्हटलंय, पंतप्रधान नरेंद्र मोदींची विधानं आजच्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडं दुर्लक्ष करतात किंवा या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करतात. आता याकडं वारंवार दुर्लक्ष होऊ लागलंय. केंद्रातील मोदी सरकार भारताच्या लोकशाहीचे तीनही स्तंभ पद्धतशीरपणे मोडीत काढत असल्याचा आरोपही सोनिया गांधींनी केलाय.त्यांनी आपल्या लेखात संसदेतील घटनांबद्दल लिहिलंय. गेल्या अधिवेशनात आम्ही सरकारची रणनीती पाहिली, ज्या अंतर्गत विरोधकांना बेरोजगारी, महागाई, सामाजिक विभाजन, अर्थसंकल्प आणि अदानी यासारखे मुद्दे उपस्थित करण्यापासून रोखण्यात आलं.सोनिया गांधींनी पुढं लिहिलंय, 'केंद्र सरकारनं विरोधाला तोंड देण्यासाठी अनेक उपायांचा अवलंब केलाय. यामध्ये भाषण बंद पाडणं, चर्चा थांबवणं, संसदेच्या मुद्द्यांवर हल्ला करणं आणि शेवटी काँग्रेस खासदाराला तडकाफडकी अपात्र ठरवणं यांचा समावेश आहे.' सोनिया गांधींनी 'द हिंदू'च्या संपादकीय लेखात लिहिलंय, लोकांच्या पैशांचा 45 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प कोणत्याही वादविवादाशिवाय मंजूर झाला, असाही आरोप त्यांनी केंद्रावर केलाय.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने