चैत्राच्या ‘वणव्या’त अजितदादांचा कथित ‘जलवा’

मुंबई:   चैत्राच्या ‘वणव्या’ची होरपळ उभ्या महाराष्ट्रात सुरू आहे. राज्यात प्रचंड गरमी वाढली आहे. तापमानाचा पारा ४० अंशाच्या पुढे आहे. चैत्राच्या वणव्याने सर्वजण होरपळून निघताहेत. दरम्यान, वातावरणामधील गरमी एकीकडे वाढली असतानाच, दुसरीकडे महाराष्ट्रात प्रचंड राजकीय गरमी वाढली आहे.राज्याच्या राजकारणात भूकंप होण्यासह ‘ज्वालामुखी’ बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अजित पवारांच्या राजकीय बंडाचा कथित ‘जलवा’ पहायला मिळण्याबद्दल चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, राज्याच्या राजकारणात होत असलेल्या प्रचंड संभाव्य उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर, सोलापूर शहर-जिल्ह्याच्या राजकीय पटलावर चिंता अन्‌ संभ्रमाचे अक्षरश: काहूर माजले. - शिवाजी भोसले

विशेष म्हणजे मुंबईत घडत असलेल्या प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्याबद्दल सर्व पक्षाचे नेतेमंडळी, पुढारी, पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते हे सज्ज राहताना दिसले. काहीजण तातडीने मुंबईकडेदेखील मार्गस्थ झाले. अजित पवारांच्या भाजप प्रवेशावर तर्क-विर्तकांना अक्षरश: उधाण आले. भविष्यातील राजकारणाची नांदी ठरविताना ‘जर-तर’ भोवतीच चर्चेच्या फैरी झडल्या.प्रत्येकजण आपापल्यापरीनुसार राजकीय भविष्य वर्तवताना दिसला. प्रचंड उष्म्याच्या होरपळीत चिंता, संभ्रम, तर्क अन् वितर्क, अफवांचे मायंदाळ पीक यामध्ये अक्षरश: वातावरण ढवळून निघाले आहे. सरकार कोसळणार का? अजित पवार हे ४० आमदारांना घेऊन पुन्हा भाजपच्या गोटात सामील होऊन ‘त्या’ पहाटेची आठवण करून देत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? अजित पवारांसह ४० आमदारांना घेऊन भाजपने सरकार स्थिर केले तर एकनाथ शिंदे गटाच्याबाबतीत भाजप पुन्हा कोणता निर्णय घेणार, यावरदेखील अनेक तर्क-वितर्क लढविले गेले.अजित पवारांची विश्वासार्हता पणाला

राष्ट्रवादी विरोधात बंड करून अजित पवार हे ४० आमदारांचे वऱ्हाड घेऊन भाजपत डेरेदाखल होणार या संदर्भात प्रचंड मोठे वादळ उठले असतानाच, मंगळवारी (ता. १८) अजित पवार यांनी सोशल मीडियावरील राष्ट्रवादीचे नाव, चिन्ह असलेला वॉलपेपर काढला.त्यामुळे त्यांची राष्ट्रवादी राहण्याची विश्‍वसार्हता पणाला लागली. राष्ट्रवादीचे नाव अन्‌ चित्र काढल्यामुळे आणखीनच तर्क अन् विर्तकांना उधाण आले.

अजित पवारांच्या भाजप प्रवेशाचे शरद पवारांकडून खंडन

अजित पवारांच्या भाजप प्रवेशाच्या उठलेल्या मोहोळावर शरद पवार यांनी मंगळवारी स्पष्टीकरण दिले. अजित पवारांच्या प्रवेशाबाबतच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही. या बातम्या निराधार आहेत. राष्ट्रवादीत असे कोणतेही बंड होणार नाही. पक्ष अधिक शक्तीशाली करण्याच्या भूमिकेतून आम्ही काम करीत आहोत, आमच्या मनात दुसरा कोणताही विचार नाही, असे शरद पवार यांनी पत्रकारांना सांगितले. अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक बोलाविली नाही. पत्रकारांनी उगीच फाटे फोडू नये, असेही शरद पवार यांनी शेवटी सांगितले.

सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ दाव्यामुळे चर्चेला बळ

राज्यामध्ये घडत असलेल्या वेगवान राजकीय घडामोडी, अजित पवारांचे कथित बंड आणि त्यांचा संभाव्य भाजप प्रवेश या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्यांनी येत्या १५ दिवसात महाराष्ट्र आणि दिल्लीत दोन राजकीय भूकंप घडणार असल्याचा थेट दावाच प्रसारमाध्यमांपुढे केला. त्यामुळे अजित पवारांच्या कथित बंडाच्या चर्चेला मंगळवारी अधिक बळकटी देण्याचा प्रयत्न अनेकांकडून झाला.

अजित पवारांचा खुलासा तरीपण वावटळ कायमच

अजित पवारांच्या भाजप प्रवेशाचे प्रचंड मोठे वादळ उठल्यानंतर अजित पवारांनी मंगळवारी प्रसार माध्यमांसमोर स्पष्टोक्ती दिली. जीवात जीव असेपर्यंत आपण राष्ट्रवादीत राहणार असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. ॲफिेडेव्हिटवर लिहून देऊ का, राष्ट्रवादी सोडणार नाही म्हणून. माझ्याबद्दल गैरसमज पसरवले जात आहेत. भाजपसोबत जाण्याबाबतच्या चर्चा निराधार आहेत. मी ४० आमदारांच्या सह्या घेतलेल्या नाहीत. असा खुलासा अजित पवारांनी केला, तरीपण त्यांच्या कथित बंडाची पर्यायाने भाजप प्रवेशाची उठलेली वावटळ कायम राहात आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा बदलू शकतो पोत

जिल्ह्यात या पक्षाची वाढू शकते मोठी ताकद

राष्ट्रवादी प्रवेशाच्या उंबरठ्यावर असलेले अनेक नेते जातील अजित पवारांसोबत भाजपमध्ये

अकलूजकर मोहिते-पाटलांच्या नेतृत्वाच्या साम्राज्याला ‘स्पीड ब्रेकर’ लागण्याचा अनेकांचा तर्क

सोलापूर जिल्ह्यावर पुन्हा ‘मोहिते-पाटील राज’ आणण्याला बसू शकतो लगाम असाही अंदाज

सोलापूर शहर अन् जिल्ह्यातील अजितदादांचा गट पुन्हा होणार ‘पॉवर’बाज

‘सोलापुरी भाजप’त माजेल मोठी खळबळ

जिल्ह्याचे पालकत्व अजितदादांकडे आल्यास नेतृत्व स्वीकारण्यावरुन मूळच्या भाजपवाल्यांमध्ये होऊ शकते धुसफुस

नेतृत्वाच्या मुद्यावरुन सोलापूर जिल्ह्यात स्वतंत्र होऊ शकतो ‘अजित पवार भाजप गट’

संजयमामा शिंदे, उमेश पाटील, संतोष पवार, दीपक साळुंके-पाटील यांच्यासह अजितदादांच्या मर्जीमधील अनेकांचे वाढू शकते राजकीय वजन

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने