ब्रिटनचे राजे चार्ल्स यांचा ६ मे रोजी राज्याभिषेक, अशी असणार शाही मिरवणूक

लंडन: ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांच्या राज्याभिषेक पुढील महिन्यात होणार आहे. यानिमित्त होणाऱ्या शाही सोहळ्याची माहिती राजघराण्याकडून रविवारी (ता.९) जाहीर करण्यात आली. यामध्ये मिरवणुकीचा मार्ग, गाड्यांचा ताफा, राज्यभिषेकावेळचा पोशाख आदींची माहिती ट्विटरवर एका खास इमोजीसह जाहीर केली आहे.राजे चार्ल्स यांच्या मातोश्री आणि ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांचा राणीपदाचा अभिषेक जून १९५३ मध्ये झाला होता. त्यानंतर ७० वर्षांनी ब्रिटनच्या राजघराण्यात राज्याभिषेक होणार आहे. सहा मे रोजी चार्ल्स (वय७४) हे ब्रिटनचे राजे म्हणून अधिकृतपणे पदग्रहण करणार आहेत. बकिंगहॅम पॅलेसने राज्याभिषेकाची संपूर्ण माहिती काल जाहीर केली. वेस्टमिनिस्टर ॲबे येथे पत्नी कॅमेला यांच्यासह नवे राजे चार्ल्स यांच्या शिरावर राजघराण्याचा मुकुट चढविला जाईल. त्यावेळी धार्मिक विधीही होतील.राजघराण्याच्या परंपरेनुसार राज्याभिषेकादिवशी म्हणजे ६ मे रोजी राजे चार्ल्स तृतीय आणि कॅमेला हे ‘डायमंड ज्युबिली स्टेट कोच (सहा घोड्यांची विशेष) बग्गीतून शाही मिरवणुकीसह बकिंगहॅम पॅलेसपासून वेस्टमिनिस्टर ॲबेला पोहचतील. ही बंदिस्त बग्गी राणी एलिझाबेथ द्वितीय हिच्या कारकिर्दीच्या ६० व्या वर्षपूर्तीनिमित्त ही बग्गी २०१२मध्ये तयार केली आहे. या बग्गीतून केवळ राजघराण्यातील प्रमुख व्यक्तीच जाऊ शकते. कधीकधी संबंधित राजा किंवा राणीचा जोडीदार असतो. राजघराण्याचे पाहुण्यांसाठी बग्गीचा वापर केला जातो. या नव्या शाही ‘डायमंड ज्युबिली स्टेट कोच’ची निर्मिती ऑस्ट्रेलियात झाली आहे, असे ‘बीबीसी’ने म्हटले आहे. हिचे रुप परंपरागत असले तरी ती आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. बग्गीत वातानुकूलन यंत्रणा, स्वयंचलित खिडक्या आहेत. बग्‍ग्यांसाठी साधारणपणे लाकडाचा वापर केला जातो. पण ‘डायमंड ज्युबिली’ ॲल्युमिनिअमपासून तयार केली आहे.हायड्रॉलिक सस्पेशनमुळे यातून प्रवास करणे अत्यंत आरामदायी असते, असे ‘रॉयल कलेक्शन ट्रस्ट’चे प्रमुख सॅली गुडसर यांनी सांगितले. डायमंड ज्युबिली स्टेट कोचच्या शीर्षावरील सोन्याचा मुकुट ओक वृक्षातून कोरलेला आहे. ‘एचएमएस व्हिक्टरी’ च्या जगातील सर्वांत जुन्या नौदलातील नौकेच्या ओक लाकडातून कोरलेला होता.

असा होणार राज्याभिषेक...

 • सहा घोड्यांच्या खास बग्गीतून सहा मे रोजी बकिंगहॅम पॅलेसपासून वेस्टमिनिस्टर ॲबेपर्यंत राजे चार्ल्स यांची शाही मिरवणूक

 • मिरवणुकीत राजाच्या संरक्षणार्थ ‘हाउसहोल्ड कव्हॅलरी’चा ताफा

 • सकाळी ११ वाजता वेस्टमिनिस्टर ॲबे येथे राज्याभिषेक विधींना सुरुवात

 • चार्ल्स यांच्या इच्छेनुसार मिरवणुकीचा मार्ग २.१ किलोमीटर एवढा कमी ठेवला आहे

 • वेस्टमिनिस्टर ॲबेपासून ते बकिंगहॅम पॅलेसपर्यंतची मिरवणूक तुलनेने मोठी असेल

 • परतीच्या मिरवणुकीत राष्ट्रकुल आणि ब्रिटिश ब्रिटिश ओव्हरसीज टेरिटरीजमधील सशस्त्र दल, ब्रिटनमधील सशस्त्र दलाचे सर्व विभाग यांच्यासह राजाचे अंगरक्षक आणि ‘रॉयल वॉटरमेन’ यांचा समावेश

 • राज्याभिषेक सोहळ्यानंतर बकिंगहॅम पॅलेसला परतल्यावर राष्ट्रकुल आणि ब्रिटनमधील सशस्त्र दलाकडून राजाला मानवंदना दिली जाणार

 • मानवंदनेच्या वेळी उपस्थित सेवकांकडून तीनवेळा सलामी दिली जाणार

 • राज्याभिषेकासाठी वापरला जाणारा ‘इम्पेरिअल स्टेट क्राउन’ हा राजघराण्यातील मुकुट राजे चार्ल्स यांच्या माथ्यावर विराजमान होणार

 • राज्याभिषेकानंतर संसदेचे कामकाज सुरू करण्यासाठी राजे चार्ल्स जात असताना त्यांच्या पुढे दोन दंड घेऊन अधिकारी चालतील

 • चांदीचा मुलामा असलेले या दंडांची निर्मिती अनुक्रमे १६६० आणि १६९५ मध्ये केली होती

 • राज्याभिषेकाच्यावेळी चार्ल्स तीन तलवारींचा वापर करणार. न्याय, सशस्त्र दलांचे प्रमुख आणि आध्यात्मिक न्यायाचे प्रतीक या तलवारी आहेत

 • राजे चार्ल्स प्रथम यांच्या राज्याभिषेकावेळी १६२६मध्ये या तलवारींचा पहिल्यांदा वापर झाला होता

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने