"उद्या लोक म्हणतील बहिणीशी लग्न करायचं, मग काय?"; केंद्र सरकारचा युक्तिवाद

दिल्ली: समलिंगी विवाह कायद्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सध्या सुनावणी सुरू असून आजचा सहावा दिवस होता. केंद्र सरकारच्या बाजूने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता युक्तिवाद करत होते. अशा विवाहाला मान्यता मिळाल्यास अनैतिक संबंधांनाही संरक्षण मिळेल, असं मेहता म्हणाले आहेत.जोडीदार निवडीच्या अधिकाराचा दाखला देत याचिकाकर्त्यांनी समलिंगी विवाह कायद्याची मागणी केली आहे. याला प्रतिवाद करताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले, "समजा एखादा व्यक्ती प्रतिबंधित नात्यात म्हणजे आपल्या बहिणीकडेच आकर्षित झाला तर? तर असं म्हणणार का की, आम्ही प्रौढ आहे, आमच्या खासगी आयुष्यात आम्ही काहीही करू.जोडीदार निवडीचा अधिकार आहे, याच आधारे कोणी आव्हान देऊ शकत नाही का? अशा विवाहासाठी निर्णय़ घेणारे तुम्ही कोण, असा प्रश्न उपस्थित होतो", असंही मेहता म्हणाले आहेत.बहिणीशी लग्न या मुद्द्याला न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी उत्तर दिलं आहे, ही फार दूरची गोष्ट आहे, असं चंद्रचूड म्हणाले आहेत. समलिंगी विवाहसुद्धा आम्हाला दूरचीच गोष्ट वाटते, असं म्हणत मेहता यांनी उत्तर दिलं आहे. पुढे मेहता यांनी बहुपत्नीत्वाचा मुद्दाही उपस्थित केला.ते म्हणाले, ""जोडीदार निवडीच्या अधिकारानुसार माझी निवड बहुपत्नीत्व आहे, असंही लोक म्हणू शकतात. लग्नाबद्दलचे नियम सार्वत्रिक आहेत. हे नियम कायदेशीर नव्हते, तेव्हाही स्विकारलेले होते. समलिंगी विवाहांना परवानगी दिली तर १६० तरतुदींवर त्याचा परिणाम होईल आणि देशाच्या वैधानिक चौकटीत मतभेद निर्माण होतील."

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने