न्यूझीलंड: जगभरात भूकंपाच्या घटनामध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, आज (सोमवारी) सकाळी न्यूझीलंडमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने (एनसीएस) दिलेल्या माहितीनुसार, रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 7.2 इतकी नोंदवण्यात आली आहे. मात्र, कोणत्याही प्रकारची हानी झाल्याचे वृत्त नाही.बिघडत चाललेले निसर्गचक्र आणि मानव-प्रेरित हवामानातील असमतोल यामुळे पृथ्वीवर दिवसेंदिवस नवीन आव्हाने वाढत आहेत. तापमानात वाढ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पाऊस, पूर आणि भूकंपात वाढ होणे या बदलांची ही उदाहरणे आहेत.
एनसीएसनुसार, न्यूझीलंडच्या उत्तर-पूर्वेला असलेल्या कर्माडेक बेटावर सकाळी 6.11 वाजता जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र, आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. त्याचवेळी, युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे अर्थात USGS ने सांगितले की, हा भूकंप जमिनीच्या 10 किलोमीटर खोलीवर झाला आहे.गेल्या महिन्यात न्यूझीलंडमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते. तेव्हाही कर्माडेक बेटाजवळ जमीन हादरत होती. त्यानंतर भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.1 एवढी होती.