दिल्ली: मिसळ पाव जगात भारी...हॉटेलच्या होर्डिंगवर हे वाक्य नेहमी वाचलं असेल. पण आता मिसळ पाव खरंच जगात भारी ठरलाय. होय, जगातल्या सर्वात चांगल्या शाकाहारी खाद्यपदार्थांच्या यादीत मिसळपावने आपलं स्थान कायम केलं आहे.मिसळ पावने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. जगातल्या सर्वात चांगल्या पारंपरिक शाकाहारी पदार्थांमध्ये मिसळपाव ११ व्या क्रमांकावर आहे. हा पदार्थ महाराष्ट्रीयन पदार्थ असला तरी, ही डिश सामान्यतः प्रत्येक घरात न्याहारी, नाश्ता किंवा मेन कोर्स म्हणूनही बनवली जाते. अनेक ऑफिसेसच्या कॅन्टीनमध्येही हा पदार्थ मिळतो. टेस्ट अटलास या वेबसाईटकडून ही यादी जाहीर करण्यात आली आहे.
मिसळमध्ये मेन म्हणजे मोड आलेली मटकी आणि त्याचा रस्सा, यात फरसाण किंवा चिवडा टाकला जातो. त्यात बटाटे, कांदे, मिरचीही टाकली जाते. ही मिसळ प्रामुख्याने पावासोबत खाल्ली जाते. मात्र काही ठिकाणी ब्रेडसोबतही दिली जाते.कोल्हापुरी, पुणेरी, खानदेशी, नाशिक, अहमदनगर अशा अनेक नावांनी अनेक ठिकाणी मिसळ विकली जाते. हल्ली हायवेच्या कडेलातर अगदी पावलापावलावर मिसळचे हॉटेल्स आहेत. जगातल्या सर्वोत्कृष्ट पदार्थांच्या यादीत या व्यतिरिक्त आलू गोबी, राजमा, मसाला वडा, भेळपुरी, राजमा चावल अशा पदार्थांचा समावेश आहे.