महाराष्ट्रातील एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाणारे कळसूबाई, पण कसळसूबाई आहे तरी कोण?

मुंबई: कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. ते महाराष्ट्रातील एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते. सह्याद्रीच्या पूर्व-पश्चिम रांगेवर कळसूबाईचे शिखर आहे. त्यामुळे, या रांगेला कळसूबाईची रांग म्हणून ओळखले जाते. सह्याद्री पर्वत रांगेत वसलेल्या कळसूबाई शिखराची उंची 1646 मीटर किंवा 5400 फूट इतकी आहे.तर शिखराच्या पायथ्याशी असलेल्या बारी गावापासून त्याची उंची जवळपास ९०० मीटर इतकी आहे. कळसूबाई शिखर हे अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर आहे. बारी गावात कोळी महादेव या आदिवासी जमातीची मुख्यत्वे वस्ती आहे. कळसूबाई ही त्यांची कुलदेवी आहे. यंदा महाराष्ट्र दिनी तुम्ही कुठे जाण्याचा प्लान करत असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी अचूक पर्याय ठरू शकतं.या ठिकाणी मांस, मटण, मद्य वर्ज्य आहे. ग्रामस्थ ते करू देत नाहीत. रात्रीच्या वेळी गडावर जायचे असेल, तर परवानगी घ्यावी लागते.उन्हाळ्यात येथे करवंदे , आवळे, जांभळे , आंबे स्थानिक आदिवासी लोक आणून देतात.नवरात्रात येथे मोठी यात्राच भरते. नवरात्रीत आणि दसऱ्यामध्ये शिखरावर उत्‍सव साजरा केला जातो.या शिखराला कळसूबाई असे नाव का पडले?

देवीची अशी आख्यायिका सांगितली जाते की, कळसुबाई ही तेथील गावातील सून होती आणि तिला बऱ्यापैकी औषधी वनस्पतींबद्दल ज्ञान होते. त्याने ती गावातील लोकांची सेवा करत असे. कालांतराने तिच्या मृत्यू नंतर गावातील लोकांनी तिची ओळख म्हणून त्या शिखराला तिचे नाव दिले आणि तिची आठवण म्हणून शिखरावर एक छोटे मंदिर बांधले.

पर्यटकांनी या ठिकाणी जाण्याआधी या सूचना लक्षात घ्याव्या

  • शिखराच्या कठीण कातळ टप्प्यांवर शिड्या बसविलेल्या आहेत. - त्यामुळे, ३ ते ४ तासांत कळसूबाईचे शिखर सर करणे सहज शक्य आहे.

  • डोंगर चढायला सुरुवात केल्यावर पहिल्या टप्प्यावर कळसूबाईचे नवीन मंदिर लागते. - ज्या लोकांना शिखरावर जाणे शक्य नाही, त्यांच्या सोईसाठी हे मंदिर बांधलेले आहे.

  • पुढे दुसरी शिडी पार केल्यावर कातळात दोन पावले कोरलेली आहेत, ती कळसूबाईची पावले आहेत, अशी भाविकांची श्रद्धा आहे. 

  • शेवटच्या शिडीच्या खाली विहीर व बाजूला एक पत्र्याची शेड आहे. - शिखरावर कळसूबाईचे छोटे मंदिर आहे.

  • देवळात साधारण ३ माणसे बसू शकतील एवढीच जागा आहे.

  • येथून समोरच खाली भंडारदऱ्याचा अथांग पसरलेला जलाशय लक्ष वेधून घेतो.

  • या शिखरावरून उत्तरेला रामसेज, अचला, अहिवंत, सप्तश्रृंग, मार्कंडा, धोडप, रवळया जवळया, कोळधेर अशी डोंगररांग नजरेस पडते.

  • पूर्वेकडे औंढा, विश्रामगड, अलंग, मदन, कुलंग, माथेरान, हरिश्चंद्रगड लक्ष वेधून घेतात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने