वर्षभरात महाविकास आघाडीची राज्यात सत्ता येणार; आमदार धंगेकरांचा मोठा दावा

पुणे : माण तालुक्याशी माझी नेहमीच जवळीक राहिली असून, माझ्या विजयात माणवासीयांचा मोठा हातभार आहे. येत्या वर्षभरात महाविकास आघाडीचीच सत्ता राज्यात येणार असून, या वेळी माणमधून प्रभाकर देशमुखांचा विजय हुकणार नाही, असा विश्वास आमदार रवींद्र धंगेकर  यांनी व्यक्त केला.आमदार धंगेकर हे निवडणुकीनंतर पहिल्यांदाच माण तालुक्यात आले होते. राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख  यांच्या लोधवडे येथील निवासस्थानी त्यांनी सदिच्छा भेट दिली. या वेळी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. युवक राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अभय जगताप, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत, दहिवडीचे नगराध्यक्ष सागर पोळ, नगरसेवक सुरेंद्र मोरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष नरळे, सुनील बाबर, बाबूराव काटकर, अमोल काटकर, शहाजी बाबर, लोधवडेचे सरपंच निवास काटकर, दिलीप चव्हाण, ड्रीम फाउंडेशनच्या अध्यक्षा अनुराधा देशमुख आदी उपस्थित होते.येत्या निवडणुकीत देशमुखांचा विजय हुकणार नाही

पत्रकारांशी संवाद साधताना धंगेकर म्हणाले, ‘‘माण तालुक्यातील लोक माझ्याही मतदारसंघात आहेत. माझ्या निवडणुकीत माणच्या माणसांचे घट्ट नाते दिसून आले. वेगळ्या टोकाला पोचलेल्या या निवडणुकीत प्रभाकर देशमुख यांनी वेळोवेळी केलेली मदत मोलाची ठरली. माझ्या विजयात त्यांनी घातलेली भर कधीही विसरू शकणार नाही. महाविकास आघाडी मोठ्या ताकदीने काम करत आहे. प्रशासकीय सेवेत असल्यापासून देशमुख यांनी माणच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यामुळे येत्या निवडणुकीत देशमुख यांचा विजय हुकणार नाही. जनहिताच्या स्वभावामुळे जनता त्यांना डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही.’’

महाविकास आघाडीचं माण तालुक्यात मोठं योगदान

धंगेकर म्हणाले, ‘‘प्रभाकर देशमुख हे तळागाळातील लोकांसाठी काम करत असून, त्यांना समाजभान आहे. महाविकास आघाडीने माण तालुक्यात शेती व पाणी याबाबत खूप योगदान देऊन काम केले आहे. त्यामुळेच बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत आम्ही नक्कीच विजयी होऊ. सर्वसामान्यांची उंची वाढविण्याचे काम करणाऱ्या धंगेकरांच्या विचाराशी घट्ट नाते असून, त्याच विचाराने आम्ही काम करत असल्याचे सांगून श्री. देशमुख म्हणाले, ‘‘सर्वसामान्यांशी थेट जोडले गेलेले हे नेतृत्व भविष्यात अधिक मोठे होईल.’’

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने