भारतीय समुदायाचा परराष्ट्र धोरणावर प्रभाव; स्वदेश चटर्जी

वॉशिंग्टन : अमेरिकेत भारतीय समुदाय अल्प प्रमाणात असेल, पण या देशाच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव टाकण्याइतपत तो प्रभावशाली आहे, असे प्रतिपादन येथील भारतीय वंशाचे नेते स्वदेश चटर्जी यांनी आज केले. भारत व अमेरिका यांच्यातील मैत्रीला खऱ्याअर्थाने नुकतीच सुरुवात झाली असून दोन देशांमध्ये ऊर्जा, आरोग्य व उद्योग या क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या प्रचंड संधी उपलब्ध असल्याचे चटर्जी म्हणाले.स्वदेश चटर्जी हे पद्मभूषण विजेते अमेरिकी भारतीय असून भारत-अमेरिकेतील द्वीपक्षीय संबंध वृद्धींगत होण्यात त्यांचेही योगदान आहे. येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते म्हणाले की,‘‘अमेरिकेत भारतीयांची संख्या कमी वाटत असली तरी अमेरिकेच्या आणि भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव टाकण्याइतके आमचे सामर्थ्य आहे.दोन देशांमध्ये सहकार्यासाठी नवीन क्षेत्रे खुली होत असून आपण आता अधिक कष्ट घेणे आवश्‍यक आहे. हे साध्य करताना अनेक वेळा गैरसमज होईल, अनेक आव्हाने निर्माण होतील. युक्रेनमधील युद्धाच्या मुद्द्यावर भारत हा पूर्णपणे अमेरिकेच्या मताशी सहमत नाही. मात्र, हे असेच असणार आहे.त्यामुळे अनेक वेळा आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होईल.’’ चटर्जी हे अमेरिकेत उत्तर कॅरोलिना राज्यात राहतात. भारताने अण्वस्त्र चाचणी घेतल्यानंतर अमेरिकेने निर्बंध घातले होते. हे निर्बंध उठविण्यासाठी चटर्जी यांनी बरेच प्रयत्न केले होते. शिवाय, भारत-अमेरिका नागरी अणु कराराला अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये मंजुरी मिळवून देण्यातही त्यांचे मोठे योगदान होते.

भारताचा विकास ही अमेरिकेसाठी संधी

भारतात होणारा आर्थिक विकास ही अमेरिकेतील उद्योगांसाठी मोठी संधी असल्याचे मत ‘अमेरिका-भारत उद्योग परिषदे’ने (यूएसआयबीसी) व्यक्त केले आहे. सध्याचे वातावरण हे द्विपक्षीय व्यापार संबंध दृढ करण्यासाठी उत्तम असल्याचे ‘यूएसआयबीसी’चे अध्यक्ष अतुल केशप यांनी आज एका कार्यक्रमादरम्यान सांगितले.अमेरिकेतील उद्योगांचे भारतातील उद्योगांशी थेट व्यापारी संबंध निर्माण होत असल्याने भारत हा अप्रत्यक्षपणे अमेरिकेतील मध्यमवर्गासाठी रोजगार निर्माण करत आहे. दोन देशांमधील व्यापार १९० अब्ज डॉलरच्या वर गेला आहे. भारताचा आर्थिक विकास होणे हे अमेरिकेतील उद्योगांसाठी फायद्याचे आहे, असे केशप यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने