राजर्षी शाहू महाराज पुण्यतिथी निमित्त शंभर सेकंदाची स्तब्ध राहून श्रद्धांजली

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांच्या १०१ व्या पुण्यतिथीनिमित्त ६ मे रोजी सकाळी साडेनऊला समाधीस्थळावर पुष्पांजली वाहिली जाईल. त्यानंतर सकाळी दहाला १०० सेकंद स्तब्ध राहून राजर्षी शाहू महाराज यांना श्रद्धांजली वाहिली जाईल. त्यानंतर शाहू मिलमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील विविध उत्पादने प्रदर्शन व विक्रीसाठी महोत्सव आयोजित केला असल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.पालकमंत्री केसरकर यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की गेल्यावर्षी ज्याप्रमाणे शंभर सेकंदाची स्तब्धता पाळली, त्याचप्रमाणे यावर्षीही नियोजन केले आहे. याशिवाय ६ मे ते १४ मे ऐतिहासिक शाहू मिलमध्ये ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व २०२३’ आयोजित केले जाईल. या ठिकाणी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.यामध्ये गूळ, कापड, चप्पल, चांदी व सोन्याचे दागिने, माती व बांबूच्या वस्तू, घोंगडी, जान, उद्योगातून निर्माण होणारी उत्पादने, पुस्तके, दुग्ध उत्पादने, खाद्य पदार्थ यांचे प्रदर्शन व विक्री होणार आहे. खाद्य महोत्सव व तांदूळ, मिरची, गूळ व वन उत्पादने आणि विशेष म्हणजे आंबा महोत्सव आयोजित केला आहे. यावर्षीचा अंबा महोत्सव आठ दिवस राहणार आहे. औद्योगिक विकास दर्शवणारे दालन असणार आहे. या दालनाच्या माध्यमातून विविध उद्योगांना त्यांच्या उत्पादित वस्तूंचे, प्रदर्शन, विक्री व ब्रँडिंग येथून करता येणार आहे.

कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी

कोल्हापूरसह संपूर्ण देशात सामाजिक परिवर्तन घडविणाऱ्या प्रभावशाली व्यक्तींमध्ये राजर्षी शाहू महाराजांचा उल्लेख करावाच लागतो. त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीत समाजकारण, अर्थकारण आणि प्रशासनाच्या सर्वांगीण विकासाचा मजबूत पाया घातला गेला. त्यांनी दूरदृष्टीने घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय आणि त्याची अंमलबजावणी यातून विकासाचे नवे पर्व निर्माण झाले. महाराजांच्या योगदानातून आपली जडणघडण झाली, म्हणूनच आपल्याला त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची एक संधी असल्याचे पालकमंत्री केसरकर यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने