चीनने कोरोनाची खरी माहिती द्यावी; डॉ. टेड्रॉस घेब्रेयेसूस

 जीनिव्हा : संपूर्ण जगात उत्पात घडवून आणणाऱ्या कोरोना विषाणूच्या उगमस्थानाबद्दल अजूनही संदिग्धता असून जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) पुन्हा चीनकडे मोर्चा वळविला आहे. कोरोनाच्या उत्पत्तीबद्दलची सर्व खरी माहिती चीनने द्यावी, असे आवाहन ‘डब्लूएचओ’चे सरचिटणीस डॉ. टेड्रॉस अधनोम घेब्रेयेसूस यांनी केले आहे. ही माहिती उघड करणे ही चीनची नैतिक अनिवार्यता आहे, असे ते म्हणाले.

ते म्हणाले, ‘‘कोरोनाच्या उगमाबद्दल चीनकडे आणखी माहिती आहे, यात शंका नाही. चीनकडे असलेली सर्व माहिती मिळाल्याशिवाय या विषाणूबद्दलच्या सर्व गृहीतके टेबलावरील चर्चेपुरतीच मर्यादित राहतील. म्हणूनच ही माहिती देण्यासाठी चीनने सहकार्य करावे. जर चीनने खोटी माहिती पुरविली असली तर कोरोनाचा प्रथम प्रसार झाल्यानंतरच्या तीन वर्षांत काय झाले आणि कशी सुरवात झाली हे आपल्याला ठावूक आहे.’’वाजवी शंकेपलीकडे, आपल्याला उत्तर माहीत असणे आवश्यक आहे, असे घेब्रेयेसूस म्हणाले. कोरोना विषाणूचा संसर्ग प्राण्यांपासून मानवात नैसर्गिकपणे झाला आणि वुहान प्रयोगशाळेतून विषाणूची गळती झाली आहे, अशा सिद्धांतावर कोरोनाच्या उगमाबद्दल शास्त्रज्ञामध्ये मतभिन्नता आहे. कोरोनाचा आजार पहिल्यांदा आढळला त्यावेळी कोरोनाला कारणीभूत विषाणू वाहून नेण्यास आणि प्रसारित करण्यास सक्षम असणारे रकून श्‍वान वुहानमधील एका बाजारात होते, असा दावा गेल्या महिन्यात प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात केला आहे.

ठोस उत्तराच्या शोधात

‘डब्लूएचओ’च्या कोरोनासंबंधीच्या तांत्रिक विभागाच्या प्रमुख मारिया व्हॅन खेरकोव्ह म्हणाल्या, की नव्या माहितीतून काही संकेत मिळाले आहेत, पण स्पष्ट उत्तर मिळालेले नाही. ही माहिती खूप आधी म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी २०२० म्हणजे तीन वर्षांपूर्वी मिळालेली आहे. योग्य मूल्यांकनासाठी विश्‍वसनीय माहिती आणि आकडेवारी मिळाली नाही तर आम्हाला अचूक उत्तर देणे अवघड आहे. कोरोनाची महासाथ कशी सुरू झाली, याचे ठोस उत्तर सध्‍या तरी आमच्याकडे नाही.कोरोनाच्या उत्पत्तीबद्दल तेथे अजून खूप माहिती आहे, याची आम्हाला कल्पना आहे. शास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिक आणि सरकारांनी ही माहिती सर्वत्र देण्याची गरज आहे. हा काही खेळ नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने