सुदानमधून ३६० जण मायदेशी परतले

नवी दिल्ली : गृहयुद्धाचा वणवा पेटलेल्या सुदानमधून ‘आॅपरेशन कावेरी’ अंतर्गत जेद्दाहहून ३६० भारतीयांना बुधवारी रात्री मायदेशी आणण्यात आले. या सर्वांचे स्वागत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ‘ट्विट’द्वारे केले. आतापर्यंत तीन तुकड्याद्वारे ५६० जेद्दाह येथे पोहोचविण्यात आले आहे.नौदलाच्या जहाजातून आधी २७८ नागरिकांना सुदानमधून बाहेर काढण्यात आले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ५३० नागरिक सुदानमधून सुखरूपपणे बाहेर पडले आहेत. ३६० भारतीयांना घेऊन जेद्दाहहून निघालेले विमान बुधवारी रात्री नवी दिल्ली येथे पोहोचले.‘ऑपरेशन कावेरी’अंतर्गत सुटका करण्यात आलेल्या भारतीयांची ही तिसरी तुकडी आहे. भारताने जेद्दाह येथे वाहतूक व्यवस्था उभारली आहे. सुदानमधील भारतीयांना घेऊन विमान किंवा जहाजाने या शहरात आणले जात आहे.नौदलाची ‘आयएनएस सुमेधा’ या जहाजातून काल २७८ भारतीयांच्या तुकडीला सुदानबाहेर आणण्यात आले. त्यानंतर ‘ ‘सी-१३०जे’ या मालवाहू विमान हे भारतीयांना घेण्यासाठी पोर्ट सुदानला पोहचले होते. त्यानंतर आणखी एका विमानातून लोकांना आणले. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले, की पहिल्या सी-१३०जे’ विमानातून १२१ प्रवाशांना जेद्दाहला आणले असून दुसऱ्या विमानातून १३५ जणांची सुटका करण्यात आली आहे. ‘दुसरे सी-१३० विमान जेद्दाहला सुदानहून १३५ प्रवाशांना घेऊन आले. ‘ऑपरेशन कावेरी’ वेग घेत आहे,’ असे ट्विट जयशंकर यांनी केले.सुदानमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारताने सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन हे मोहिमेची पाहणी करण्यासाठी जेद्दाहला पोहोचले आहेत. तेथून भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी हवाई दलाची लष्करी मालवाहू विमाने सज्ज आहेत.

जयशंकर पनामामध्ये

पनामा सिटी ; संघर्षग्रस्त सुदानमधून अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आणि सुरक्षितपणे परत आणण्यासाठी भारताने ''ऑपरेशन कावेरी'' सुरू केले आहे, अशी माहिती जयशंकर यांनी पनामातील भारतीय समुदायापुढे आज दिली. ते सोमवारी (ता.२४) गयानातून पनामाला पोहोचले. अध्यक्ष निटो कोर्टिझो यांची भेट घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभेच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचविल्या. जयशंकर यांनी आज भारतीय समुदयाशी संवाद साधला व पनामातील मंदिरालाही भेट दिली.जयशंकर एका संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये पाकिस्तानवर पुन्हा टीका केली आहे. सातत्याने भारत विरोधी दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तान सारख्या शेजाऱ्यांबरोबर संबंध प्रस्थापित करणे अवघड असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

राज्यांचा मदतीचा हात

सुदानमध्ये अडकलेले भारतीय मायदेशी परतल्यानंतर त्यांच्यासाठी मोफत प्रवास आणि निवास व्यवस्था अशा प्रकारची मदत देण्याचे अनेक राज्यांनी जाहीर केले आहे. सुदानहून परतणाऱ्या भारतीयांसाठी मदतकेंद्रेही सुरू केली आहेत. केंद्र सरकारच्या बचाव मोहिमेतून भारतात येणाऱ्या मल्याळी नागरिकांना केरळमध्ये आणण्यासाठी आवश्‍यक व्यवस्था केली जाईल, असे राज्य सरकारने सांगितले.मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. केरळी नागरिकांसाठी विविध विमानतळांवर अनिवासी केरळी व्यवहार मंत्रालयाच्या वतीने मदत करण्यात येणार आहे. सुदानमध्ये अडकलेल्या उत्तर प्रदेशच्या नागरिकांना मदत करण्यासाठी दिल्लीतील निवासी आयुक्त कार्यालयात आज केंद्र सुरू केले आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लखनौत दिली.सुदानहून दिल्लीत पोहचलेल्या राजस्थानच्या नागरिकांना राज्यात आणण्याचा खर्च राजस्थान सरकार उचलणार आहे. त्यांच्या निवासाची सोयही राज्यातर्फे केली जाणार आहे. मध्य प्रदेश सरकारनेही मदत केंद्र सुरू केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने