"उद्धव ठाकरेंच्या मार्फत माझं तिकीट कापण्याचा शरद पवारांचा प्लॅन होता"

मुंबई: शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी शरद पवारांबद्दल एक गौप्यस्फोट केला आहे. शरद पवार उद्धव ठाकरेंच्या मार्फत आपलं तिकीट कापण्याच्या तयारीत होते, असं विधान त्यांनी केलं आहे. पण आपण पवारांच्याच तालमीत तयार झालोय हे ते विसरले, असंही पाटील म्हणाले आहेत.काय म्हणाले शहाजी बापू पाटील?

आमदार खासदार आपल्या दारी या कार्यक्रमादरम्यान शहाजी बापू पाटील यांनी हे विधान केलं आहे. ते सध्या सांगोल्याच्या दौऱ्यावर आहेत. पाटील म्हणाले, "शरद पवार हे देशाचे नेते आहेत. आता ते मानतायत की नाही माहित नाही, पण गेले ४५ वर्षे ते माझे पालक आहेत. पण पवारांच्या राजकारणाच्या इतिहासाचा जर बारकाईने विचार केला, तर त्यांच्या जवळ जे गेले, त्यांना सगळ्यांना त्यांनी हरवून बाद करून टाकलं."

पाटील पुढे म्हणाले, "जे पक्ष त्यांच्याजवळ गेले, ते सगळे लहान लहान पक्ष पवारांनी संपवलं. शिवसेना १५ च्या वर जाऊ द्यायचं नाही, असा त्यांचा प्लॅन होता. पण आमचे त्यावेळचे नेते उद्धव ठाकरे मंत्रालयाकडे येत नव्हते. ते पाहून आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी एकनाथ शिंदेंकडे नेतृत्व दिलं."४० आमदारांची यादी तयार होती, त्यांची तिकीटं कापण्याचा विचार होता, असा दावाही शहाजी बापूंनी केला आहे. या यादीत आपलंही नाव होतं. उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून आपलंही तिकीट कापण्याचा प्लॅन होता, असंही शहाजी बापू पाटील म्हणाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने