शरद पवार भाजपाजवळ जातील का? राजकारणाबद्दल प्रश्न तुमचे; उत्तरं आमची

 मुंबई:  1. शरद पवार भाजपाजवळ जातील का?

आजच्या घडीला याचे उत्तर नाही असे म्हणावे लागेल. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना शरद पवार असं म्हणतात 'आजघडीला मविआतील घटक पक्षांची भूमिका एकत्र काम करण्याची आहे. पण भविष्यात कोण काय भूमिका घेईल याबद्दल सांगू शकत नाही.' त्यामुळे भाजपसोबत जाण्याचे शरद पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे थेट संकेत या क्षणी नाहीयेत. पण सध्याच्या परिस्थितीत तयार झालेली राजकीय अनिश्चितता, दुसऱ्या फळीतील राष्ट्रवादीतील नेत्यांची महत्वाकांक्षा बघता येत्या काळात राजकीय गणितं अशीच कायम राहतील, असे ठामपणे म्हणता येणार नाही. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीची तयारी जवळपास सुरु झाली असताना आपापले राजकीय महत्व ठळक करण्याचा प्रयत्न प्रत्येकाचा राहील.2. शरद पवार आणि राहुल गांधी संबंधांमध्ये तणाव वाढलाय का?

- केंद्रीय अधिवेशनानंतर वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन पवार यांनी अदानींची पाठराखण करत जेपीसी स्थापनेला विरोध केला. यंदाच्या अधिवेशनात काँग्रेसने अदानींच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला घेरले होते. अशावेळी पवारांनी या मुद्द्याच्या विरोधात भूमिका मांडल्याने राहुल गांधी आणि पवार यांच्यात काही ठीक नाही अशी चर्चा सुरु झाली. केंद्रीय आणि महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी यावरून शरद पवार यांच्यावर टीकाही केली. पण या सगळ्या प्रकरणात मुद्दा पवार आणि गांधी यांच्यात वाद आहे की नाही हा नसून येत्याकाळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेची जुळवाजुळव करतांना काँग्रेस सोबत राहील की नाही असा आहे. सध्याच्या राजकीय नरेटिव्ह मध्ये अशी 'रिस्क' पवार निवडणुकांपूर्वी घेतील असे वाटत नाही.पवारांच्या गेल्या काही दिवसातल्या मांडणीतून ते स्वतः असे स्पष्ट करतात की मते भिन्न असू शकतात म्हणजे मतभेद आहेत असे नाही. तसेच मते भिन्न असली तरी काँग्रेसच्या मागणीला विरोध करणार नाही, अशीही भूमिका पवारांनी घेतली आहे.

3. शरद पवारांचा पॅटर्न नेमका काय असतो?

- काँग्रेसमधून बाहेर पडून शरद पवार यांनी १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतरच्या सार्वत्रिक निवडणूक निकालानंतर त्यांनी पुन्हा काँग्रेससोबत जुळवून घेतले. शरद पवार यांच्या राजकीय महत्वाकांक्षेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अस्तित्वात आला. पक्षाची राजकीय रचना 'सत्तेभोवती' झाल्याने पक्षाच्या वाढीला राज्यभर मर्यादा राहिली.तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातील प्रमुख प्रादेशिक पक्ष बनला आणि राज्यात सत्ता मिळविण्यासाठी काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहणे अपरिहार्य बनले. विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत शरद पवारांनी भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचे जाहीर केले. पण निकालानंतर भाजप - शिवसेना युती होऊन फडणवीस मुख्यमंत्री बनले. राज्यातील या प्रयोगांसोबतच पवारांनी राष्ट्रीय राजकारणातही महत्वाचे स्थान मिळवले.विधानसभेला २०१९ च्या निवडणुकीत पवारांच्या पुढाकाराने महाविकास आघाडीचा पर्याय महाराष्ट्रात अस्तित्वात आला आणि राष्ट्रीय राजकारणात तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरु झाली. त्याचे नेतृत्व पवारांकडे आले.

4. उद्धव ठाकरेंबाबत विधान, उद्धव ठाकरे सिल्व्हर ओक येथे जाणं याचा राजकीय अर्थ काय?

उद्धव ठाकरे यापूर्वी सिल्व्हर ओकवर गेले आहेत. त्याचे फोटोही सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. पण त्या भेटी कौटुंबिक होत्या असे उपलब्ध फोटो - व्हिडिओवरून दिसते.सध्याच्या राजकीय अस्थिरतेत उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना राजकीय भेटीसाठी सिल्व्हर ओकवर जाण्याचे महत्वाचे कारण म्हणजे उद्धव यांच्यासमोरची राजकीय अपरिहार्यता. भाजप विरोधात लढण्यासाठी मविआ कायम ठेवणे त्यांच्यासाठी आवश्यक आहे. मविआचे जनक पवार होते आणि पवारांनी पुढाकार घेतला तरच उद्धव मविआच्या शीर्षस्थानी राहतील, हेही स्पष्ट असून याची जाणीव ठाकरेंना आहे.याचे राजकीय परिणाम मात्र दीर्घकाळ होतील. कारण ठाकरे म्हणजे राजकारणातील पॉवर सेंटर होते. आदित्य ठाकरेंनी थेट निवडणूक लढवणे, त्यानंतर उद्धव यांनी मुख्यमंत्री होऊन सक्रिय राजकारणात येणे या सगळ्याचा परिणाम ठाकरे ब्रँडवर होतोय. बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही सक्रिय राजकारणात सहभाग नोंदवला नव्हता. त्यामुळे बाळासाहेब समांतर सत्ता केंद्र बनून राहिले. तसे उद्धव आणि आदित्य यांच्याबाबतीत होणार नाही. आदित्य ठाकरे यांचे राजकारण पूर्णपणे वेगळे वळण घेऊ शकेल.

5. नेहमी अजित पवारांबाबत संभ्रम का निर्माण होतो?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांच्या राजकीय महत्वाकांक्षेतून तयार झालेला पक्ष आहे. त्यामूळे स्थापनेपासून जेव्हा जेव्हा सत्तेत सहभागी होण्याची वेळ आली तेव्हा पवारांनी पक्ष विस्तार डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री पदासारखे एखादे पद पदरात पाडून घेण्याऐवजी इतर महत्वाची खाती अशी जुळवाजुळव केलेली दिसते. या सगळ्यात अजित पवार यांच्या वैयक्तिक राजकिय महत्वाकांक्षेला मर्यादा येत राहिल्या आहेत.गेल्या काही वर्षातील राजकीय घटनाक्रम बघितला तर अजित पवार स्वतःचं स्वतंत्र राजकीय अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. अशावेळी पवारांच्या समांतर अशी स्वतःची ठळक भूमिका मांडताना ते दिसतात. त्यातच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अचानक पहाटे फडणवीस यांच्यासोबत जाऊन उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यांचे हे बंड पवारांनी मोडून काढले. तेव्हाही शरद पवारांच्या राष्ट्रिय राजकारणातली गणितं, त्यांची एकूणच राजकरणात तयार झालेली बेभरवशाची प्रतिमा मोडून काढण्याचा प्रयत्न अधिक होता.त्यामुळे अजित पवार बंड करू शकतील अशी शक्यता तयार होते. शिवाय बंड करतांना आवश्यक असलेले संख्याबळ जुळवून आणण्याची क्षमताही इतरांपेक्षा अजित पवार यांची अधिक आहे. त्यामुळे वारंवार संशयाची सुई त्यांच्यावर असते.

6. पवार- भाजप एकत्र आल्यास शिंदे सरकारचं भवितव्य काय असेल?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांवर कोर्टाने निलंबनाची कारवाई केली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा राष्ट्रवादीतील एक गट भाजपसोबत जाण्याची शक्यता चर्चेत आहे. त्यामुळे त्या परिस्थितीत कोर्टाने आधीच त्यांचे राजकीय भविष्य स्पष्ट केलेले असेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने