लखनौ: भाजप तिहेरी इंजिनचा दावा करते. केंद्र, राज्य आणि उत्तर प्रदेशातील शहरांत त्यांची सत्ता असूनही शहरे स्मार्ट बनली नाहीत, असा दावा समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केला. भाजपवर त्यांनी भ्रष्टाचाराचा आरोपही केला.शहरी विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत आपल्या सपला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले. ते म्हणाले की, या निवडणूका फार महत्त्वाच्या आहेत. राज्याची लोकसंख्या आणि त्याचबरोबर शहरांमधील समस्याही वाढत आहेत. यास भाजप कारणीभूत आहे.
याचे कारण शहरांमध्ये दीर्घ काळापासून त्यांची सत्ता आहे. लखनौ असो किंवा कानपूर, आग्रा अथवा वाराणसी... सगळीकडे भाजपचे महापौर आहेत. अयोध्येत भ्रष्टाचाराच्या तक्रारी आल्या आहेत. भाजप महापौरावर जमीन गैरव्यवहाराचा आरोप झाला. त्यामुळे त्यांना यावेळी तिकीट नाकारण्यात आले.शाहजहानपूरमध्ये भाजपला उमेदवारही मिळालेला नाही, असा दावा करून ते म्हणाले की, सपच्या उमेदवार अर्चना वर्मा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनाच भाजपने उमेदवारी दिली.सपच्या लखनौ महापौरपदाच्या उमेदवार वंदना मिश्रा याप्रसंगी उपस्थित होत्या.