राष्ट्रवादीचं 'घड्याळ' आधीच बंद पडलंय; जाहीर सभेत स्मृती इराणींचा शरद पवारांना टोला

बेळगांव : राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ आधीच बंद पडलं आहे; तर गरीब, दलित, शोषितांबद्दल कळवळा व्यक्त करणाऱ्या काँग्रेसचा ढोंगीपणा विविध मुद्द्यांवर उघडकीस आल्याने त्यांचा करिष्मा चालणार नाही, असं स्पष्ट मत केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री स्मृती इराणी  यांनी व्यक्त केलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारची कामगिरी देशात चमत्कारिक ठरली असून, विकासकामांत भारी ठरलेल्या मंत्री शशिकला जोल्ले यांचा विजयाचा वारू कुणीही रोखू शकणार नाही, असा दावाही स्मृती इराणी यांनी केला.काल (मंगळवार) सायंकाळी येथील व्हीएसएम हायस्कूलच्या मैदानावर भाजप उमेदवार मंत्री जोल्ले यांच्या प्रचारार्थ महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. प्रा. विभावरी खांडके यांनी स्वागत केलं. मंत्री ईराणी म्हणाल्या, घड्याळ बंद पडल्याने राष्ट्रवादीतील लोक पक्षातून बाहेर पडत आहेत, यामुळं राष्ट्रवादीनं आधी आपलं घर सांभाळावं. कर्नाटकात लिंगायत व इतर समाजाला आरक्षण दिल्यानं काँग्रेसला इतकी पोटतिडीक कशासाठी? असा सवाल त्यांनी केला.

शेवटी त्यांनी मतदान कोणाला द्यायचं? असा जनतेला प्रश्न करत शरद पवारांना  पण सांगा, असा मिश्किल टोला हाणला. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णादेवी यांचंही भाषण झालं. यावेळी खासदार अण्णासाहेब जोल्ले, हालशुगरचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, अजित गोपचडे, नगराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्यक्षा निता बागडे, वृषभ जैन, शांभवी अश्वतपूर, भारती मगदूम, बसवप्रसाद जोल्ले, ज्योतिप्रसाद जोल्ले, प्रणव मानवी, पवन पाटील आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने