'त्यांचं सगळं गेलं, पण मस्ती जात नाही', खर्गेंच्या मोदींवरच्या टीकेवरुन बावनकुळे संतापले

मुंबईः काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी मोदींना उद्देशून 'विषारी साप' असा शब्दप्रयोग केल्याने देशभरात भाजप नेते संताप व्यक्त करीत आहेत. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक ट्विट करुन खर्गे आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली.

काय म्हणाले होते मल्लिकार्जून खर्गे?

सध्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आज मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधानांविरोधात वादग्रस्त विधान केलं. ते म्हणाले की, मोदी हे विषारी सापासारखे आहेत. तुम्ही त्याला विष समजा अगर नका समजू परंतु ते चाखलं तर मरुन जाल. या विधानानंतर खर्गे यांनी स्पष्टीकरण दिलंय. ते म्हणाले की, मी त्यांच्याबद्दल (पंतप्रधान मोदी) हे विधान केलं नाही. मी व्यक्तिगत वक्तव्य करीत नाही. त्यांची विचारधारा सापासारखी आहे, असं मला म्हणायचं होतं. जर तुम्ही विष चाखलं तर मृत्यू होणार, असं मला म्हणायचं होतं. अशा शब्दांमध्ये त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे.चंद्रशेखर बावनकुळेंचं उत्तर त्यांच्याच शब्दांत

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे मानसिक संतुलन ढळले आहे, म्हणूनच ते विश्वप्रिय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याबद्दल वारंवार वाईट बोलतात. कर्नाटक निवडणुकीत खर्गेंनी सभ्यतेच्या मर्यादा ओलांडल्या. गांधी परिवाराला मोदीजींबद्दल आकस आहेच. 'मौत का सौदागर' पासून सुरु झालेला काँग्रेस नेत्यांचा पोटशूळ आज 'जहरीला साप’ इथंपर्यंत पोचला. यांना कधीच चांगले शब्द सापडत नाहीत. बोलताही येत नाहीत. त्यांच्या शब्दकोशातच नाहीत. त्यांची सत्ता गेली, राज्ये गेली, मतदार गेले, समर्थक गेले, नेते गेले, खासदारकी गेली, घर गेले पण डोक्यातली विकृत विचारांची मस्ती जात नाही.

बावनकुळे पुढे म्हणतात, शिव्या पडतात, वाईट बोलले जाते म्हणजे मोदीजींच्या वादळात काँग्रेसचा केरकचरा उडून जाण्याची वेळ नक्की झाली हाच याचा अर्थ! मोदीजींची लाट काँग्रेसचे कान, नाक आणि डोके बधिर करत आहे. खर्गेजी लक्षात घ्या, आम्ही जनतेच्या भल्यासाठी भारताच्या 'अमृतकाळाचे' भान ठेवतो. तुम्ही अमृतकाळात "विषाची" आठवण ठेवता. तुमची संस्कृती विष पेरण्याची, समाजाला विभाजीत करण्याची आहे. म्हणूनच तुम्हाला विष आठवते. तुम्हाला कर्नाटकी जनता माफ करणार नाही. अशा शब्दांमध्ये बावनकुळे यांनी काँग्रेसचा समाचार घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने