प्रयागराज: आता यूपीमध्ये कोणताही माफिया कोणालाही धमकावू शकत नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अतिक-अशरफ यांच्या हत्येनंतर दिली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ लखनौमधील एका आयोजित कार्यक्रमात बोलत होते. आता यूपीमध्ये कोणताही माफिया कोणालाही धमकावू शकत नाही. पूर्वी काही जिल्ह्यांच्या नावानं लोक घाबरायचे. आता कायद्याचं राज्य प्रस्थापित झालं आहे. इथं आता दंगली होत नाहीत, असंही ते म्हणाले.
प्रयागराजमध्ये माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांच्या खळबळजनक हत्येनंतर सीएम योगी यांचं सार्वजनिक कार्यक्रमातील हे पहिलं भाषण होतं. लखनौ ते हरदोई दरम्यान एक हजार एकर जागेवर मेगा टेक्सटाईल पार्क उभारण्यासाठी केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकार यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्याच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला मंत्री पियुष गोयल हेही उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले, 'आता कोणताही गुन्हेगार किंवा माफिया उद्योजकाला फोनवर धमकावू शकत नाही. 2017 पूर्वी उत्तर प्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडली होती. हे राज्य दंगलींसाठी प्रसिद्ध होतं. अनेक जिल्हे असे होते की लोक त्यांच्या नावाला घाबरायचे. मात्र, आता लोकांना जिल्ह्याच्या नावानं घाबरण्याची गरज नाही.'
यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी यूपीमधील कायदा आणि सुव्यवस्थेचं कौतुक केलं. ते म्हणाले, 2017 पूर्वी यूपीमध्ये विकासाच्या बाबतीत भेदभाव केला जात होता. ऐतिहासिक निर्णय घेऊन जनतेनं डबल इंजिनचं सरकार स्थापन केलं. अटलजींना लखनौचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून संपूर्ण जगानं ओळखलं. पीएम मोदी आणि योगी आदित्यनाथ यांनी ऐतिहासिकदृष्ट्या यूपीचं चित्रच बदललं. लवकरच लखनौ टेक्सटाईल पार्कची पायाभरणी पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. देशातील सात टेक्सटाईल पार्कपैकी लखनौ टेक्सटाईल पार्क प्रथम तयार होईल, असं आश्वासन आम्ही मुख्यमंत्र्यांकडून घेतलं आहे.