पैलवानांना आले चांगले दिवस ! गावजत्रांत कुस्तीतून झाली १० कोटींची उलाढाल

कोल्हापूर : कोरोनामुळे गेली दोन-तीन वर्षे यात्रा-जत्रा थांबल्याने गावोगावची कुस्ती मैदाने थांबली होती. यंदा ती मोठ्या प्रमाणात झाल्याने कुस्ती क्षेत्रात १० कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल झाल्याने पैलवानांना चांगले दिवस आले आहेत.महापुरानंतर काही दिवसांतच आलेल्या कोरोनामुळे जिल्ह्याने लॉकडाऊनची परिस्थिती अनुभवली. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास साठहून अधिक कुस्ती मैदाने रद्द झाली. तालमींनाही कुलपे लागली होती. दंड-बैठकांचे गावोगाव घुमणारे आवाज थांबले होते. सांगली जिल्ह्यातील कुंडल, पलूस, देवराष्ट्रे, बांबवडे, बोरगाव, बेनापूर, विटा ही कुस्तीची मुख्य मैदाने रद्द झाली. त्याचबरोबर गावजत्रा बंद झाल्या.त्यामुळे कुस्ती मैदाने नाहीत. तेव्हा कुस्तीपटू, शौकिनांच्या उत्साहावर पाणी फिरले. पुढे फेब्रुवारीपासून गावोगाव जत्रांचा हंगाम सुरू व्हायचा. तो मे अखेर चालतो. जिल्ह्यात चिंचोली, पाडळी, विटा, बेनापूर, त्याचबरोबर साखर कारखान्यातर्फे कुस्ती मैदाने होतात. वर्षभर सराव केलेले मल्ल या गावोगावच्या कुस्ती मैदानात मोठ्या आशेने उतरतात. अलीकडे बऱ्यापैकी बिदागी मिळत असल्याने मल्लही समाधानी आहेत.मिळालेल्या या बिदागीतून पुढील वर्षीच्या खुराकाचा खर्च भागवला जातो. मैदाने संपली की ते आपापल्या गावाकडे परततात. गावाकडे एक महिना राहून पुन्हा जूनपासून आपल्या तालमीत दाखल होतात. आपल्यातील कमतरता शोधत पुन्हा नव्या उमेदीने कसून सराव करतात. हे वर्ष मल्लांना वरदान ठरले.

संयोजक पराभूत मल्लांना चाळीस टक्के, विजेत्या मल्लांना साठ टक्के रक्कम देतात. त्यामुळे मल्लांच्यात देखील समाधानाचे वातावरण आहे. यंदा जिल्ह्यात साठहून अधिक मैदाने झाली.१० कोटींहून अधिक रुपयांची आर्थिक उलाढाल झाली. प्रथम क्रमांकाच्या जोडीतील मल्ल असे ः शिवराज राक्षे, सिकंदर शेख, महेंद्र गायकवाड, माऊली जमदाडे, विजय गुटाळ, मारुती जाधव, योगेश बोंबाळे, बाला रफिक शेख, नंदू आबदार, संतोष दोरवड, हसन पटेल, सूरज निकम, भारत मदने, विष्णू खोसे, सुबोध पाटील, संदीप मोठे, किरण भगत, गोकुळ आवारे, हर्षद सदगीर, आदर्श गुंड, संतोष सुतार, समीर देसाई,गणेश जगताप, योगेश पवार, समाधान पाटील.यावर्षी गावोगावी जत्रा-यात्राच्या निमित्ताने कुस्ती मैदाने झाल्याने पैलवानांच्यात आनंदाच वातावरण आहे दातृत्वाचे अनेक हात पुढे येत आहेत, ही चांगली गोष्ट आहे

सिकंदर शेख, कुस्तीपटू

मैदाने रद्द झाल्याने पैलवानांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले होते. यावर्षी मैदाने चांगल्या प्रकारे झाल्याने बिदागीने ते बऱ्यापैकी सुरळीत होईल,

- ज्योतिराम वाजे, कुस्ती समालोचक

मैदाने रद्द झाल्याने पैलवान व कुस्ती अडचणीत आली होती. गरीब कुटुंबातील मल्लांची अवस्था बिकट होती. याच वर्षी झालेली महिला व पुरुष महराष्ट्र केसरी स्पर्धा, गावोगावची कुस्ती मैदाने यामुळे मल्लांना चांगले दिवस येत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने