"कारखाना चांगला सुरूये पण, पोरांची लग्न होईनात"; मतदारांनी मतपेटीत टाकल्या चिठ्ठ्या

कोल्हापूर: श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. यामुळं कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष या निकालाकडं लागलंय. मतमोजणी सुरू असून मतपेटीमध्ये मतदारांनी काही चिठ्ठ्या टाकल्याचं उघड झालं आहे.काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांची प्रतिष्ठा पणाला लागलीये. आज दुपारपर्यंत निकालाचा कल स्पष्ट होणार आहे. तर मतदारांनी राजकारण्यांना मतपेटीमध्ये चिठ्ठ्या टाकून सडेतोड सवाल केले आहेत.दरम्यान, ही निवडणूक बॅलेट पेपरवर होत असते. त्यामुळे सभासदांना जे काही म्हणणं मांडायचं असतं ते मतदानाबरोबर त्यावर मांडत असतात. या निवडणुकीत पाच ते सहा चिठ्ठ्या सापडल्या असून माजी चेअरमन सर्जेराव माने यांच्यावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर सत्ताधारी आणि विरोधी गटावरही मतदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.एका सभासदाने लिहिलं आहे की, "महाडिक साहेब, कारखाना अगदी व्यवस्थित चालू आहे. पण कर्मचाऱ्यांची लग्न होत नाहीत. त्यांच्या ऑर्डरी तेवढ्या काढा. रिटायर्ड व्हायला आली तरी पर्मनंट नाहीत" अशा शब्दांत मतदारांनी खंत व्यक्त केली आहे.राज्यातील इतर शहराच्या तुलनेत कोल्हापुरातील राजकारण कोणत्या ना कोणत्या कारणावरून चांगलेच चर्चेत असते. तर तेथील मतदारही राजकारण्यांना चांगलंच वठणीवर धरत असतात. त्याचीच प्रचिती सध्या मतदारांनी राजकारण्यांना घडवून दिली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने