'मी त्याचीच वाट बघतोय'; राष्ट्रवादीच्या नेत्याचं शिवसेनेच्या आमदाराला थेट चॅलेंज

पळशी : ‘‘माझी अवस्था शोलेतील असरानीसारखी असली, तरी आपण शोलेतील गब्बर सिंग जसा गावाला वेठीस धरून लुटत होता, तशाच पद्धतीने तुम्ही आज कोरेगाव मतदारसंघाला लुटत आहात आणि आव मात्र साधू- संताचा आणत आहात. ‘खोटं बोल; पण रेटून बोल’, ही तुमच्या खोके व मिंधे सरकारची रणनीती तुम्ही इथे वापरत आहात. लोकांचं पाणी बंद करण्याचे पाप तुम्ही करता, अशी टीका आमदार शशिकांत शिंदे यांनी आमदार महेश शिंदे यांच्‍यावर केली आहे.

आमदार महेश शिंदे यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, की महेश शिंदे आपण फक्त अडीच वर्षांच्या राजकारणाचा उल्लेख केला. या काळात आपण कुठली जलसंधारणाची, कुठली इरिगेशनची कामे केली? आपण ज्या-ज्या लोकांना आश्वासने दिली, त्या भाडळे खोऱ्यामध्ये, पुसेगावच्या वरच्या भागामध्ये आणि त्याचबरोबर कोरेगाव तालुक्यातील रामोशीवाडी, शेल्टी, खिरखिंडी, जायगाव या भागामध्ये आपण नक्की काय करून दाखवलं, यांचा खुलासा एकदा जनतेसमोर होणे गरजेचे आहे.मग ठेकेदारीची तुम्हाला काय गरज होती?

तुमचं काय चाललंय? १५-२० टक्क्यांनी तुम्ही कामं घेताय, सामान्य, स्थानिक कंत्राटदाराला बाजूला ठेवून स्वतःचे कंत्राटदार पोसताय. अगदी कोरेगाव नगरपंचायत, मेडिकल कॉलेजपासून सगळ्या कामाच्या संदर्भामध्ये तुमच्यावर आरोप होतच आहेत. कशा पद्धतीने दमबाजीने पैसे वसूल करताय, याची चर्चा खमंगपणाने कोरेगाव मतदार संघात सुरू आहे. जो तुम्ही टेंडरचा उल्लेख केला, ते टेंडर भरण्यासाठी काही कंत्राटदारांनी अर्ज केलेला असताना त्यांना जो टॅग लागतो, तो मिळू नये म्हणून तुम्ही तुमची माणसं बसवली होती. हे कशासाठी, ठेकेदारीसाठी आणि तुमचं घर भरण्यासाठीच केले होते ना? तुम्ही फार अगदी ब्राझील रिटर्न होता, तर मग या ठेकेदारीची तुम्हाला काय गरज होती? आणि माझ्यावर आरोप करताना ‘रस्ते बघा’ असे सांगता, आता काय अवस्था आहे.

दुसऱ्यावर ढकलायचं, हे पाप जास्त दिवस चालत नाही

सिमेंटचे रस्ते वर्षभरामध्येच उखडले, परिस्थिती बघून घ्या. खटावमध्ये जाणाऱ्या रस्त्याचा निकष, नियम बघा, त्याला किती टक्क्याने कोणी पैसे घेतले त्याची पण चर्चा आहे. सात कोटींचा रस्ता किती टक्क्याने कोणी पैसे घेतले, अधिकारी, कंत्राटदाराला कोण दम मारते, टेंडर भरू नका, असे कोण म्हणते, आपण करायचं, दुसऱ्यावर ढकलायचं, हे पाप जास्त दिवस चालत नाही. ही तुमची चाललेली थेरं जनतेच्या लक्षात आली आहेत. पैसे तुम्ही गोळा करताय, तुम्ही भ्रष्टाचार करताय आणि आमच्यावर आरोप करताय? माझं कुटुंब त्याच्यावर चालत नाही. मी राजकारण माझ्या पद्धतीने केलेलं आहे.

तुमच्यासारखे दोन नंबरचे धंदे करून पैसे कमावले नाहीत

तुमच्यासारखे दोन नंबरचे धंदे करून मी पैसे कमावले नाहीत, त्याच्यावर आपण एकदा व्यवस्थितपणे बोलू; पण एखादा विषय दुसरीकडे वळवण्यामध्ये तुमचा हात कोणी पकडू शकत नाही. लोकांचं पाणी बंद करण्याचे पाप तुम्ही करता, माझे आव्हान आहे, तुमच्यात हिम्मत असेल, तर तुम्ही पुढाकार घेऊन सगळ्या अधिकाऱ्यांना आणि पुसेगाव भागातील लाभार्थी गावांना, भाडळ्यापासून ज्यांना ज्यांना आपण आश्वासन दिले, त्या सर्व लोकांना एकत्र बोलवा आणि अधिकाऱ्यांसमोर चर्चा करूया, असे आवाहनही शशिकांत शिंदे यांनी दिले.

एकदाचा सोक्षमोक्ष होऊनच जाऊ दे...

येत्या काळामध्ये तुम्ही, मी, खासदार अशी बैठक लावा. ‘जिहे-कटापूर’च्या बाबतीमध्ये एकदा लोकांसमोर सोक्षमोक्ष होऊ द्या आणि मग खरं काय, दूध का दूध पाणी का पाणी ते कळेल. हे आव्हान आपण स्वीकारणार का आणि बैठक लावणार का? त्याचीच मी वाट बघतोय,’ अशा शब्दांत आमदार शशिकांत शिंदे यांनी आमदार महेश शिंदे यांना आव्हान दिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने