खानापूर: बेणापूर (ता. खानापूर) येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त भव्य कुस्ती मैदान पार पडले. प्रथम क्रमांकासाठीच्या कुस्तीमध्ये सिकंदर शेख (कोल्हापूर) याने बनिया अमिन (पंजाब) याला एकचाकी डावावर चितपट करीत मैदान मारले.या कुस्तीसाठी आर.बी.भोसले उद्योग समूह (सांगली) यांनी तीन लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. मैदानात एकूण पंधरा लाख रुपयांची बक्षिसे वाटण्यात आली. मैदान रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू होते.
द्वितीय क्रमांकासाठीची मंजित खत्री (हरियाना) विरूद्ध साहिल पैलवान (इराण) यांच्यातील कुस्ती प्रदीर्घ वेळेनंतर बरोबरीत सोडविण्यात आली. या कुस्तीसाठी हंबीरराव जाधव, हर्षद जाधव यांनी दोन लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. मैदानात पंचाहत्तर हजार रुपये इनामाच्या पाचही कुस्त्या प्रेक्षणीय व निकाली झाल्या. यात स्थानिक मल्ल अक्षय कदम (बेणापूर) याने छोटा गौरव (पंजाब) याला आकडी डावावर चितपट केले, तर सुबोध पाटील (सांगली) याने वैभव माने (पुणे) याला पोकळ घिस्सा डावावर पराभूत केले.संदीप मोटे (सांगली) याने काही मिनिटांतच अक्षय मदने (पुणे) याला चितपट केले. किशोर पाटीलने (बेणापूर) सचिन ठोंबरे (सांगली) वर चटकदार विजय मिळवला. अनिल जाधव (कुर्डुवाडी) याने विकास पाटील (पुणे)वर प्रेक्षणीय विजय मिळविला.
मैदानास दुपारी तीनला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष नामदेवराव मोहिते, भगवानराव भोसले, जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र शिंदे, प्रा. प्रतापराव शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे यांच्या उपस्थितीत सुरूवात झाली.आमदार अनिल बाबर, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक उत्तमराव पाटील, सयाजीराव पाटील, परशराम गायकवाड, मोहनराव पाटील, हणमंतराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रथम महिला महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बागडी हिचा सत्कार करण्यात आला.गणपतराव भोसले, कृष्णदेव शिंदे, राजाराम शिंदे, शशिकांत शिंदे, सरपंच दत्तात्रय गोसावी, उपसरपंच अमित शिंदे, श्रीकृष्ण जाधव, अतुल जाधव, जयसिंग रजपूत, रणजित भोसले, समीर मुजावर, महादेव शिंदे, शंकर शिंदे यांनी संयोजन केले.