कुस्तीपटूंच्या रस्त्यावरील आंदोलनामुळे बदनामी

नवी दिल्ली : भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधात भारतीय कुस्तीपटूंनी नवी दिल्ली येथील जंतरमंतर येथे आंदोलन केले आहे. लैंगिक शोषणाचा आरोप करीत ते रस्त्यावर उतरले आहेत; मात्र भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षा पी. टी. उषा यांना ते पटलेले नाही. भारतीय कुस्तीपटूंनी बेशिस्त वर्तणूक केली असून, यामुळे भारताची बदनामी होत आहे, असे स्पष्ट अन्‌ परखड मत त्यांनी या वेळी व्यक्त केले आहे.पी. टी. उषा पुढे म्हणाल्या, भारतीय कुस्तीपटूंनी रस्त्यावर आंदोलन करण्यापेक्षा भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या ॲथलीट कमिशनकडे हे प्रकरण सोपवले असते, तर बरे झाले असते. 

या समितीत मेरी कोम व शरथ कमल हे दोन खेळाडू आहेत. त्यांनी या प्रकरणाचा योग्य तो तपास केला असता, असे त्यांनी सांगितले. भारतीय ऑलिंपिक संघटनेचे संयुक्त सचिव कल्याण चौबे यांनीही कुस्तीपटूंवर टीका करताना म्हटले की, खेळ व खेळाडू थांबायला नको.संघटनेचे कामही थांबायला नको; पण कुस्तीपटूंच्या आंदोलनामुळे यावरच विपरीत परिणाम झालेला आहे. भारतीय कुस्तीपटूंनी वाईट उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे, अशा शब्दांत त्यांनी खडे बोल सुनावले आहेत. दरम्यान, उषा यांच्या वक्तव्यावर कुस्तीपटूंनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती, असे कुस्तीपटूंचे म्हणणे आहे.



शेवटपर्यंत लढत राहणार ः बृजभूषण सिंह

भारतातील कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंह यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. या आरोपाचे बृजभूषण यांच्याकडून सातत्याने खंडन करण्यात आले आहे. आता गुरुवारी त्यांनी एका व्हिडीओद्वारे आपण ही लढाई अखेरपर्यंत लढत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ते म्हणतात, शरीरामध्ये शक्ती असेपर्यंत लढत राहीन. जेव्हा माझ्या शरीरातील लढण्याची ताकत कमी होईल, जेव्हा मला असहाय वाटेल, जगण्याची इच्छा संपेल, अशा वेळी अशा प्रकारचे जीवन जगण्यापेक्षा जगातून निरोप घेईन. मृत्यूला सामोरे गेलेले मला आवडेल, असे त्यांनी पुढे सांगितले.

बबिता फोगाटचा यू टर्न

बृजभूषण सिंह यांच्याविरोधात नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे भारतीय कुस्तीपटू रस्त्यावर आंदोलन करीत आहेत; मात्र आपल्याच एका सहकाऱ्याने यू टर्न घेतल्यामुळे आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. एका प्रसारमाध्यमामधून अशा प्रकारचे वृत्त समोर आले आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर एका कुस्तीपटूने सांगितले की, बबिता फोगाट ही आमची बहीण. तिनेच आम्हाला आंदोलन करण्यास भाग पाडले. तसेच आंदोलनादरम्यान कोणत्याही राजकारण्याला तेथे बोलवायचे नाही, असेही तिच्याकडून सांगण्यात आले. आम्ही तिचे सर्व ऐकले; पण स्वत: बबिता हिने फायद्यासाठी या प्रकरणाचे राजनीतीकरण केले. यू टर्न घेतला. आमच्या पाठीत खंजीर घुपसला, असे निराश उद्‌गार त्याच्याकडून काढण्यात आले.

अस्थायी समितीची घोषणा

भारतीय ऑलिंपिक संघटनेकडून भारतीय कुस्ती संघटनेचा दैनंदिन कारभार चालवण्यासाठी तीनसदस्यीस अस्थायी समितीची निवड करण्यात आली आहे. यामध्ये भारताची माजी नेमबाज सुमा शिरुर, भारतीय वुशू संघटनेचे प्रमुख भूपेंद्र बाजवा आणि उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश यांचा समावेश आहे. न्यायाधीशांचे नाव अद्याप ठरवण्यात आलेले नाही. या समितीकडे भारती कुस्ती संघटनेची जबाबदारी असणार आहे. नवीन कार्यकारिणी स्थापित होत नाही, तोपर्यंत हीच समिती या संघटनेचा कार्यभार सांभाळणार आहे.

चौकशी निष्पक्ष करणार : ठाकूर

भारतातील कुस्तीपटूंनी राष्ट्रीय कुस्ती संघटनेच्या अध्यक्षांवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणाची चौकशी निष्पक्ष व्हायला हवी. आमचे प्रयत्नही तसेच असणार आहेत. कुस्तीपटूंची बाजू ऐकली गेल्यानंतरच हे प्रकरण पुढे जाणार आहे. भारतातील क्रीडापटूंना कोणतीही तडजोड करायला लागू नये, असे स्पष्ट मत क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी गुरुवारी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने