पंतचा अपघात अन् दिल्ली संघाची सर्व गणिते बिघडली, पहिल्या विजयाची आस

मुंबई: सौरव गांगुली आणि रिकी पाँटिंग वेगवेगळ्या नात्याने सपोर्ट स्टाफमध्ये असले तरी दिल्ली कॅपीटल संघाला यंदाच्या आयपीएलमध्ये चार सामन्यानंतर एकही विजय मिळवता आलेला नाही. आज त्यांचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाबरोबर होत आहे.गाडी अपघातामुळे रिषभ पंतला झालेली गंभीर दुखापत त्यानंतर दिल्ली संघाची सर्व गणिते बिघडली आहेत. हुकमी खेळाडू आणि कर्णधाराशिवाय त्यांना खेळावे लागत आहे. अनुभवी डेव्हिड वॉर्नर नेतृत्वाची धुरा सांभाळत असला तरी कधी काळी अंतिम फेरीपर्यंत पोहचलेल्या दिल्लीला यंदा एकही विजय हाती लागलेला नाही.

दिल्ली संघात तसे नावाजलेले फलंदाज आहेत, परंतु वॉर्नर आणि त्याचा उपकर्णधार अक्षर पटेल यांचा अपवाद वगळता इतर सर्व फलंदाज निराशा करत आहेत त्याच मिशेल मार्श लग्नासाठी मायदेशी परतल्यामुळे त्यांची फलंदाजी अधिकच कमकूवत झाली आहे. तो आता संघात परतला असल्याचे सांगण्यात येत आहे.सध्या सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये वॉर्नर दुसऱ्या क्रमांकावर आहे, परंतु त्याचा ११४.८३ हा स्ट्राईक रेट चिंता करणारा आहे. वेगात धावा करण्यास तो अपयशी ठरत आहे, कदाचीत दुसऱ्या बाजूने साथ मिळत नसल्यामुळे डाव सावरण्यावर वॉर्नरचा भर असल्याचे सांगण्यात येत आहे.



वॉर्नरचा सलामीचा साथीदार आणि आयपीएलच्या अनेक सामन्यांमध्ये तुफानी टोलेबाजी करणाऱ्या पृथ्वी शॉचे यंदाचे अपयश संघाची लय बिघडवत आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात विजय मिळवायचा असेल तर पृथ्वी शॉ, मनिष पांडे, यश धुल यांनी मोठे योगदान देणे अतिशय महत्वाचे आहे. परदेशी खेळाडूंमध्ये रोवमन पॉवेलनेही निराशा केली आहे उद्या त्याच्याऐवजी फिल साल्टला संधी मिळू शकते.दिल्लीची गोलंदाजी एन्रिक नॉर्किया आणि मुस्तफिझुर रहमान यांच्यावर आधारलेली आहे. कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांची त्यांना साथ असेल, परंतु नॉर्कियाचा अपवाद वगळता इतरांनी तेवढी प्रभावी कामगिरी केलेली नाही.

दुसऱ्या बाजुला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा संघ आपली गाडी रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. सलामीच्या सामन्यात मुंबईला सहज पराभूत केल्यानंतर पुढच्या दोन सामन्यांत त्यांनाही पराभवाची चव चाखावी लागली आहे. असे असले तरी सलामीला खेळणारा विराट कोहली चांगल्याच फॉर्मात आहे. कर्णधार डुप्लेसीही चांगली साथ देत आहेत, मॅक्सवेलला मात्र सातत्य दाखवावे लागणार आहे. तर कार्तिकला फलंदाजीबरोबर यष्टीरक्षणातही चुका टाळाव्या लागणार आहे. मोहम्मद सिराज आणि हर्षल पटेल आजच्या सामन्यातही प्रभाव पाडतील अशी आशा बंगळूरचा संघ करत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने