मुंबई: बॉलीवुड मधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते यश चोप्रा यांच्या पत्नी पामेला चोप्रा यांचं निधन झालं आहे. पामेला यांना 15 दिवसांपूर्वी मुंबईतल्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या 15 दिवसांपासून त्यांच्या उपचार सुरू होते. त्या व्हेंटिलेटरवर होत्या. गुरुवारी सकाळी त्यांची प्रकृती आणखी बिघडली आणि वयाच्या 74 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.पामेला यांचे पती यश चोप्रा यांचे 11 वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. त्यानंतर त्या आपल्या दोन मुलांसह म्हणजे आदित्य आणि उदय चोप्रा यांच्यासोबत राहत होत्या. त्यांची दोन्ही मुलं याच क्षेत्रात असून राणी मुखर्जी या आदित्य चोप्रा यांच्या पत्नी आहे. त्यामुळे चोप्रा कुटुंबावर आणि राणी मुखर्जीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पामेला या पाश्वगायिका होत्या. इतकंच नव्हे तर त्या लेखिका आणि निर्मातीसुद्धा होत्या. पामेला यांनी 1970 मध्ये यश चोप्रा यांच्याशी लग्न केलं. या दोघांचं अरेंज मॅरेज होतं. 1976 मधील ‘कभी कभी’पासून ते 2002 मधील ‘मुझसे शादी करोगी’पर्यंत असंख्य गाणी पामेला चोप्रा यांनी गायली आहेत.1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आईना’ या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली होती. त्याचसोबत त्यांनी पती यश चोप्रा, मुलगा आदित्य चोप्रा आणि लेखिका तनुजा चंद्रा यांच्यासोबत 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिल तो पागल है’ या चित्रपटाची पटकथा लिहिली होती. या चित्रपटातील एका सीनमध्येसुद्धा त्या झळकल्या होत्या. ‘एक दुजे के वास्ते’ या गाण्याच्या ओपनिंग सीनमध्ये पामेला पतीसोबत दिसल्या होत्या.