कर्नाटक विधानसभा निवडणुकीत ‘आरपीआय ‘आठवले गट’ १५ जागा लढविणार

कर्नाटक: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाकडून १५ जागा लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे; पण या पक्षाच्या अन्य गटांकडून कर्नाटक विधानसभा निवडणूक लढविली जाणार की नाही? याबाबत साशंकता आहे. पक्षाच्‍या गवई गटाकडून निवडणुकीबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही.वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनीही कर्नाटक विधानसभा निवडणूक लढविण्याबाबतचा निर्णय जाहीर केलेला नाही. ऑक्टोबर २०२२ मध्ये आठवले गटाच्या कर्नाटक राज्य कार्यकारिणीची बैठक बंगळूर येथे झाली होती.

 त्यावेळी पक्षप्रमुख केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपस्थित होते. पक्षाची नवी कार्यकारिणीही जाहीर केली होती. आता पक्षाने २२४ पैकी केवळ १५ जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी चार जागा या बेळगाव जिल्ह्यातील आहेत. त्यात बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण व निपाणी या मतदारसंघांचा समावेश आहे. चार दिवसांत पक्षाकडून उमेदवारांची नावे जाहीर केली जाणार आहेत.उमेदवारांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले बेळगाव जिल्‍ह्यात येणार आहेत. केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत घटक पक्ष म्हणून आरपीआयच्या आठवले गटाचा समावेश आहे. त्यामुळेच आठवले यांना केंद्रात मंत्रिपदही मिळाले आहे. पण कर्नाटक विधानसभा निवडणुकीत या पक्षाने भाजपसोबत युती केलेली नाही. या आधीच्या दोन विधानसभा निवडणुकांमधील आरपीआयची कामगिरी अत्यंत निराशजनक आहे. २०१३ व २०१८ ला आरपीआयच्या दोन्ही गटांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविली होती. २०१३ साली आरपीआयने राज्यातील ६ जागांवर उमेदवार उभे केले होते. त्या सहा उमेदवारांना मिळून केवळ १२ हजार ४९८ मते मिळाली होती.२०१३ सालीच पक्षाच्या आठवले गटाकडून १२ उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्या १२ उमेदवारांना मिळून केवळ ८ हजार १९३ मते मिळाली होती. म्हणजे २०१३ च्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांची मतांची टक्केवारी अत्यंत कमी होती. २०१३ सालच्या ५९ पक्षांकडून आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते. प्रमुख तीन पक्ष वगळता अन्य पक्षांची कामगिरी नगण्य होती. २०१३ साली महाराष्ट्र एकीकरण समितीने राज्यातील दोन जागा जिंकल्या होत्या.पण आरपीआयच्या दोन्‍ही गटांनी निवडणूक लढविली तरी त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. शिवाय दोन्ही गटाला मिळालेली मते खूपच कमी होती. २०१८ साली निवडणुकीत ८३ पक्षांनी उमेदवार रिंगणात होते. त्यात आरपीआय व आरपीआय आठवले गटाचा समावेश होताच. २०१८ साली आरपीआयकडून ८ उमेदवार रिंगणात होते. त्या आठ जणांना मिळून २१ हजार ६८७ मते मिळाली होती. ८ पैकी १ उमेदवारांने तिसऱ्या क्रमांकाची मते मिळविली होती, हे विशेष. 

आठवले गटाकडून २०१८ च्या निवडणुकीत २५ उमेदवार रिंगणात उतरवले होते. पण या २५ उमेदवारांना मिळून केवळ ९ हजार ६४९ मते मिळाली होती. त्यामुळे २०१३ व २०१८ या दोन्ही विधानसभा निवडणुकीत आरपीआयच्या दोन्ही गटांची कामगिरी अत्यंत निराशजनक होती.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या या पक्षाचे अस्तित्व महाराष्ट्र राज्यात आहे. पण कर्नाटकात या पक्षाला अद्याप फारसे यश मिळालेले नाही. ज्या मतदारसंघात दलितांची संख्या जास्त आहे, त्या मतदारसंघात उमेदवार देण्याचा प्रयत्न या पक्षाकडून झालेला आहे. पण दलित मतांचे ध्रुवीकरण करण्यात पक्षाला एकदाही यश मिळालेले नाही.

पाळेमुळे घट्ट नाहीत

कर्नाटकातील दलित मतदार ही कॉंग्रेस पक्षाची पारंपरिक व्होट बॅंक आहे. त्यामुळेच आरपीआयच्या दोन्ही गटांना कर्नाटकात आपली पाळेमुळे अद्याप घट्ट करता आलेली नाहीत. दहा वर्षांपूर्वी बेळगाव जिल्ह्यात या पक्षाचे संघटन होते, पण ते संघटन वाढविण्यासाठी पक्षाकडून प्रयत्न झालेले नाहीत. आरपीआय निवडणूक लढविणार इतकीच चर्चा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने