बस दरीत कोसळून 13 प्रवासी ठार; देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश

मुंबई:   जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर शनिवारी पहाटे 4 च्या सुमारास भीषण अपघात झाला. एक खासगी बस दरीत कोसळून झालेल्या या भीषण अपघातामध्ये 13 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.त्याशिवाय, या बसमध्ये एकूण 40 ते 45 जण प्रवास करत असल्याचीही माहिती मिळाली असून त्यामुळं मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. प्रवाशांपैकी 20 ते 25 जण जखमी झाल्याचंही सांगितलं जात आहे.यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  म्हणाले, 'सध्या 18 प्रवाशांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तर, 10 प्रवाशांना खोपोली आणि एका प्रवाशाला खासगी जकोटिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.'या दुर्घटनेत 29 प्रवाशी जखमी झाले आहेत. यात 24 पुरुषांचा समावेश आहेत. ही अतिशय दुर्देवी घटना आहे. जे प्रवासी मृत्यूमुखी पडलेले आहेत, त्यांच्या कुटुंबीयांना शासन मदत करेल. तसेच जे लोक जखमी आहेत, त्यांच्यावर उपचार करण्याचे आदेश आम्ही दिले आहेत. याशिवाय ही बस कोसळण्यामागचं नेमकं कारण काय आहे, याची देखील चौकशी करण्याचे आदेश आम्ही दिले आहेत, असं फडणवीस यांनी सांगितलं. दरम्यान, या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दुःख व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने