अखेरच्या षटकात रिंकू सिंगचे 5 षटकार

अहमदाबाद – टी-20 क्रिकेट हा असा खेळ आहे की त्यात काहीही घडू शकते. आज अहमदाबादमध्ये गुजरात विरुद्ध कोलकाता यांच्यातील सामन्यात हेच बघायला मिळाले. प्रथम फलंदाजी करणार्‍या गुजरातने 20 षटकांत 204 धावा केल्या होत्या, तर या धावसंख्येचा पाठलाग करताना 17 व्या षटकात कोलकाताची अवस्था 7 बाद 155 अशी झाली होती. त्यामुळे गुजरात हा सामना आरामात जिंकणार असे वाटत होते. पण शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात कोलकाताला 6 चेंडूत 29 धावा हव्या होत्या आणि ते अशक्य होते पण रिंकू सिंगने 5 षटकार ठोकून आपल्या संघाला सनसनाटी विजय मिळवून दिला आणि गुजरातच्या हातून विजयश्री अक्षरश: खेचून आणली.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय गुजरातच्या फलंदाजांनी सार्थ ठरवीत 204 धावा केल्या. सलामीवीर वृद्धिमान सहा याला सुनील नरीनने 17 धावांवर बाद केले. त्यानंतर शुभमन गिल आणि सुदर्शन यांची जोडी जमली. या जोडीने 67 धावांची भागीदारी केली.

सुयश शर्माने ही जोडी फोडताना गिलचा 39 धावांवर त्रिफळा उडवला. पण मधल्या फळीतील मनोहर मात्र 14 धावांवर बाद झाला. त्याचा सुयश शर्माने त्रिफळा उडवला. त्यानंतर सुदर्शनच्या जोडीला विजय शंकर आला आणि दोघांनी धावसंख्या वाढवायला सुरुवात केली. या दोघांनी 35 धावांची भागीदारी केली. सुदर्शनला सुनील नरिनने 53 धावांवर बाद केले. तर विजय शंकर 63 धावांवर नाबाद राहिला. अशा तर्‍हेने गुजरातने 20 षटकांमध्ये 4 बाद 204 अशी दमदार मजल मारली. दरम्यान विजयासाठी 205 धावांचे आव्हान स्वीकारून मैदानात उतरलेल्या कोलकाता नाईट रायडरची खराब सुरुवात झाली. सलामीवीर गुरबाजला शमीने 15 धावांवर बाद केले. तर दुसरा सलामीवीर जगदीशन 6 धावांवर बाद झाला.

त्यानंतर कर्णधार नितेश राणा आणि व्यंकटेश अय्यर यांची जोडी जमली. या दोघांनी 100 धावांची भागीदारी केली, पण नितेश राणा 45 धावांवर बाद झाला. पाठोपाठ रसेल 1, सुनिल नरीन 0, शार्दूल ठाकूर 0 असे 3 फलंदाज अवघ्या 1 धावेवर रशिद खानने बाद केले. तर व्यंकटेश अय्यर 83 धावा करून परतला. मात्र रिंकू सिंग आणि उमेश यादव यांनी तुफानी फलंदाजी करीत 7 बाद 155 वरून धावा वाढवायला सुरुवात केली. शेवटच्या षटकांत 29 धावा हव्या होत्या. रिंकू सिंग याने 5 षटकार ठोकून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. रिंकू सिंग 48 धावांवर तर उमेश यादव 5 धावांवर नाबाद राहिला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने