कर्नाटक जिंकण्यासाठी भाजपनं बनवली Super 60 टीम; 'या' नेत्यांवर सोपवली जबाबदारी

कर्नाटक: गुजरातच्या धर्तीवर कर्नाटकात पुन्हा सरकार स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं विशेष रणनीती तयार केली आहे. या रणनीतीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे, या माध्यमातून कर्नाटकातील 60 कमकुवत जागांवर विजय मिळवण्यासाठी भाजप (BJP) पूर्ण ताकद लावणार आहे.कर्नाटकातील जागा जिंकण्यासाठी भाजपनं आपल्या 60 (Super 60 Team) नेत्यांची विशेष टीम तयार केली आहे. राज्यातील 112 हून अधिक जागा जिंकून बहुमताचा आकडा गाठण्याचं लक्ष्य ठेवून या नेत्यांना राज्यात जबाबदारी देण्यात आली आहे. 2018 साली भाजप दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता.



'या' राज्यांतील नेत्यांचा समावेश

भाजपनं उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि दिल्लीतील नेत्यांचा आपल्या टीम सुपर 60 मध्ये समावेश केला आहे. दिल्लीचे भाजप खासदार प्रवेश वर्मा यांच्याकडं हावेरी विधानसभेची जबाबदारी देण्यात आलीये. तसेच खासदार रमेश बिधुरी यांच्याकडं हसन जिल्ह्यातील बैलूर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे.याशिवाय, उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री स्वतंत्र देव सिंह, मथुराचे आमदार श्रीकांत शर्मा, झारखंडचे खासदार निशिकांत दुबे, उत्तर प्रदेशचे आमदार सतीश द्विवेदी आणि आंध्र प्रदेशचे नेते पी सुधाकर रेड्डी आणि इतर अनेक नेत्यांना वेगवेगळ्या क्षेत्रांची जबाबदारी देण्यात आली आहे.

म्हैसूर सिटी विधानसभा जिंकण्यासोबतच राजीव बब्बर म्हैसूरच्या विधानसभांवर लक्ष ठेवणार आहेत. दिल्लीचे माजी महापौर जय प्रकाश यांच्याकडं रामनगर जिल्ह्यातील जागांवर लक्ष ठेवण्याची, तसेच मगडी विधानसभेची जागा जिंकण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर आशिष सूद यांच्याकडं बडगी विधानसभा जिंकण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.दिल्लीतील आमदार विजेंदर गुप्ता आणि अजय महावर यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे. बिहारचे आमदार संजीव चौरसिया यांच्याकडं चिक्कोडी विधानसभेची जबाबदारी देण्यात आली आहे. कर्नालचे खासदार संजय भाटिया यांना तुमकूर जिल्ह्यातील गुब्बी विधानसभेचे प्रभारी बनवण्यात आले आहे. दरम्यान, टीम सुपर 60 च्या सर्व सदस्यांना 11 एप्रिलपर्यंत कर्नाटक गाठून आपापल्या भागातील विधानसभा निवडणुकीची जबाबदारी घेण्यास सांगण्यात आलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने