शुभमनलाच मुंबईचा कळवळा! शतक ठोकत मुंबईला पोहचवले प्ले ऑफमध्ये

बेंगलोर : विराट कोहलीच्या झंजावाती शतकामुळे आरसीबीने 198 धावांचा डोंगर उभारला मात्र शुभमन गिलच्या 52 चेंडूत ठोकलेल्या 104 धावांच्या शतकी खेळीमुळे गुजरातने हा डोंगर पार केले. मात्र गुजरातच्या या धडाकेबाज विजयाचा आनंदोत्सव हा मुंबईत साजरा केला जाणार आहे. कारण मुंबईने प्ले ऑफचे तिकीट शुभमन गिलच्या शतकी खेळीमुळे पक्के केले.

गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर बेंगलोरचे 198 धावांचे आव्हान 19.1 षटकात 4 विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. गिलने 8 षटकार 5 चौकार मारत 104 धावांची तुफानी खेळी केली. त्याला विजय शंकरने 53 धावा करत चांगली साथ दिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 123 धावांची भागीदारी रचली. हीच भागीदारी आरसीबीच्या पराभवाचे कारण ठरली.
गुजरातने या विजयाबरोबरच आपला लीग स्टेजमधील 10 वा विजय मिळवला. ते आता 20 गुण घेत अव्वल स्थानावर आहेत. आरसीबी हरल्यामुळे त्यांचे 14 गुणच झाले. याचा फायदा मुंबई इंडियन्सला झाला. त्यांनी हैदराबादचा पराभव करत बहुमूल्य 2 गुण मिळवत 16 गुणांची कमाई केली. आता ते 16 गुणांसह चौथ्या स्थानावर आहेत. ते आता लखनौ सुपर जायंट्स यांच्याविरूद्ध इलिमनेटर सामना खेळणार आहेत.

आरसीबीने ठेवलेल्या 198 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातचा पॉवर प्लेमध्ये पहिला धक्का बसला. सलामीवीर वृद्धीमान साहा 12 धावांवर बाद झाला. त्याला मोहम्मद सिराजने बाद केला.

मात्र त्यानंतर सलामीवीर शुभमन गिल आणि विजय शंकर यांनी आरसीबीच्या गोलंदाजांना चोपण्यास सुरूवात केली.

शुभमन गिल आणि विजय शंकर यांना दुसऱ्या विकेटसाठी 123 धावांची दमदार भागीदारी रचली. विजय शंकर 35 चेंडूत 53 धावा करून बाद झाला. त्यावेळी गुजरात 15 व्या षटकात 148 धावांपर्यंत पोहचला होता.

मात्र यानंतर आरसीबीने दसुन शानका आणि डेव्हिड मिलर यांना अनुक्रमे शुन्य आणि सहा धावांवर बाद केले. यामुळे गुजरातसकट मुंबईचाही बीपी वाढला होता. मात्र दुसऱ्या बाजूने धडाकेबाज फलंदाजी करणाऱ्या शुभमन गिलने षटकार आणि चौकारांची बरसात केली.

गिल आपल्या शतकाच्या जवळ पोहचला होता. मात्र सामनाही बॉल टू रन आला होता. गुजरातला सामना जिंकण्यासाठी 6 चेंडूत 8 धावांची गरज होती. शेवटचे षटक टाकणाऱ्या वेन पार्नेलने पहिला नो बॉल त्यानंतर वाईड बॉल टाकून गुजरात आणि मुंबईची मदतच केली. अखेर फ्री हिटवर शुभमन गिलने षटकार ठोकत आपले शतक, गुजरातचा विजय आणि मुंबईचे प्ले ऑफचे तिकीट फायनल केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने